इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे काहीतरी खास असतंच. त्यामुळेच सगळ्यांनाच त्याची उत्सुकता असते. बॉलिवूडमधील असेच एक चर्चेत असणारे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा मागील काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचं लग्न देखील ठरलं होत. मात्र ते लग्न कोरोनामुळे रखडला. आता त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. इतकी वाट पाहून होणारं हे लग्न साधं तर नक्कीच नसणार. रिचा-अली यांचं लग्न हे दिमाखात आणि थाटामाटात होणार आहे. यासाठी त्यांनी एक जागा देखील ठरवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिचा चड्ढा आणि अली फजल यांचं लग्न दिल्लीतल्या प्रसिद्ध दिल्ली जिमखाना क्लबमध्ये होणार असल्याचं कळतंय. १९१३ मध्ये हा क्लब बांधण्यात आल्याचं म्हटलं जातं. या ऐतिहासिक क्लबच्या सदस्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. तर या दोघांचं प्री-वेडिंग शूट दिल्लीच्या आयकॉनिक हॉटेलमध्ये पार पडणार असल्याचं समजतंय. या दोघांचं लग्न एकदम रॉयल अंदाजात होणार असल्याचीही माहिती आहे.
या क्लबमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. दिल्ली जिमखाना क्लब हे देशातील सर्वात जुनं आणि सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे. या क्लबच्या सदस्यत्वासाठी जवळपास ३७ वर्षांची वेटिंग लिस्ट असल्याचं सांगितलं जातं. या महिन्याच्या अखेरीस रिचा-अलीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात होईल. दिल्लीत प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडल्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत रिचा आणि अली विवाहबद्ध होतील. तर ७ ऑक्टोबर रोजी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.
अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कधीच लपवाछपवी केली नाही. अली-रिचाची जोडी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र झळकली होती. रिल लाईफ कपलने रिअल लाईफ कपल होण्याच्या दृष्टीने २०१५ मध्ये सुरुवात केली. ७४ व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये अलीच्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला, तेव्हा अली आणि रिचा यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. २०१५ मध्ये डेटिंग सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.
Actress Richa Chadha And Actor Ali Fazal Wedding Ceremony