मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत झालेल्या या शाही समारंभातील अनेक बाबी सध्या समोर येत आहेत. खासकरुन उपस्थितांची नावे, त्यांचे पोशाख, लग्न सोहळ्यातील काही क्षण आणि इतर अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. आता एवढ्यातच एक उल्लेखनीय बाब सर्वांच्या समोर आली आहे. ती म्हणजे, नवरदेव असलेल्या रणबीरला आहेर म्हणून काय भेट वस्तू मिळाली, कुणी त्याला काय गिफ्ट दिले याविषयी सध्या मनोरंजन वर्तुळात चर्चा झडत आहेत.
तब्बल ५ वर्षांच्या गाठी-भेटी, मैत्री नंतर रणबीर-आलिया विवाह बंधनात अडकले आहेत. या विवाहाचे विविध फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियात येत आहेत. त्यातील काही व्हायरल झाले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया भट्टची आई (दिग्दर्शक महेश भट्ट यांची पत्नी) म्हणजेच, रणबीरची सासू सोनी राजदान हिने जावयाला खास गिफ्ट दिले आहे. ते म्हणजे, अत्यंत महागडे घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत अडीच कोटी रुपये सांगितली जात आहे. तर, नवरी मुलगी असलेल्या आलियाला कपूर कुटुंबाकडून अतिशय महागडी आणि आलिशान अशा हिऱ्याची अंगठी दिल्याचे सांगितले जात आहे.