इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरून मनोरंजन विश्वात पदार्पण केलेली, गोड आणि सोज्ज्वळ चेहेऱ्याची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करून तिने छोट्या पडद्यावर स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे. सध्या मात्र प्राजक्ता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. प्राजक्ताने आता आपला ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे.
प्राजक्ताने याबाबत तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने याबद्दलची माहिती दिली होती, मात्र ब्रँडचे नाव सांगितले नव्हते. नुकतेच तिने आपल्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडचे उदघाटन केले. मनसेप्रमुख राज ठाकरे या सोहोळ्याला उपस्थित होते. प्राजक्ताचं हे नवीन रूपही तिच्या चाहत्यांना निश्चितच आवडेल. ऑगस्ट १९८९ रोजी पंढरपुरात जन्मलेल्या प्राजक्ताने २०११ पासून अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनयाच्याबरोबरीने प्राजक्ता एक उत्तम नृत्यांगना आणि लेखिकाही आहे. प्राजक्ताचं ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १० लाखांपेक्षाही जास्त फॅन्स आहेत.
https://twitter.com/prajaktamali/status/1610238182091784194?s=20&t=pApX29vqlDTnF-j2yiVdrw
या नवीन रोलबद्दल प्राजक्ता म्हणते की, मला दागिन्यांची खूप आवड आहे. त्यातही ‘पावनखिंड’ करताना पारंपरिक मराठी दागिन्यांची ओळख झाली. मात्र, ते सहज कुठेही उपलब्ध होत नाहीत हे लक्षात आलं. त्यामुळेच काहीतरी वेगळं करावं असा प्रयत्न केला आहे.
ब्रँडच्या नावाबद्दलही प्राजक्ता म्हणते की, सगळ्यांनी या ब्रँडचं नाव ‘प्राजक्तसाज’ असं सुचवलं होतं. ‘प्राजक्तसाज’ हे नाव छान आहे पण ते थेट लक्षात आलं असतं की हा एखाद्या दागिन्यांचा ब्रँड आहे, म्हणून हे नाव ठेवलं नाही. त्याऐवजी मी ‘प्राजक्तराज’ हे नाव निवडलं.” ‘राज’ या शब्दाला एक वजन, भारदस्तपणा आहे. तो शब्द उच्चरताच भारी वाटतं. कुठल्याही शब्दाला राज शब्द जोडला की त्याचं वजन वाढतं. उदाहरणार्थ आपण एखादा खूप देखणा असेल तर त्याला राजबिंडा असं म्हणतो. माझ्या दागिन्यांचंही तसंच आहे. म्हणून ”प्राजक्तराज” हे नाव निवडल्याचं प्राजक्ता सांगते.
https://twitter.com/prajaktamali/status/1613771578759876608?s=20&t=pApX29vqlDTnF-j2yiVdrw
Actress Prajakta Mali Started New Business