मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात एखादी आनंदाची किंवा दुःखाची घटना घडली, तर त्याचे मन थाऱ्यावर राहत नाही. तो अत्यंत आनंदात किंवा दुःखात बुडून गेल्याने त्याला आपण नेमके काय करतो आहोत, याची प्रत्यक्ष जाणीव नसते. त्याच्या मनात एक वेगळीच हालचाल सुरू असते. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी टीव्हीवरील कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. याला कारण म्हणजे यातील अभिनय करणारे चांगले मराठी कलाकार होय, त्याचप्रमाणे यामध्ये अँकरची भूमिका सादर करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी होय. सध्या प्राजक्ताचे अनेक वेब सिरीज आणि चित्रपट रिलीज झाले असून त्यामुळे ती चर्चेत आहे. मात्र एका चित्रपटात माझे मन थाऱ्यावर नव्हते, असा खुलासा तिने याबाबत केला आहे.
अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर हा चांगलाच चर्चेत असून येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, संदीप पाठक, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, नंदू माधव हे कलाकार चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
विशेष म्हणजे हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असून अभिनेत्री प्राजक्ता माळी ही या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. दरम्यान, प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ही चांगलीच चर्चेत आहे. रानबाजार या वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेसाठी तिला ट्रोल केले जात आहे. तर दुसरीकडे अनेक चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सध्या तिचे हे चित्रपट चांगलेच हिट ठरताना दिसत आहे. ‘वाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘वाय’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता, असे तिने या मुलाखतीत सांगितले. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोष्टी होत होत्या. त्यावेळी ब्रेकअप झाल्यामुळे मी सध्या कुठे आहे, माझे काय काम सुरु आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती. मी एका वेगळ्यात विचार विश्वात वावरत होती, त्यामुळे या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानच्या अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत, असेही प्राजक्ता म्हणाली.
आम्ही जेव्हा हा चित्रपट पाहात होतो, तेव्हा मला चित्रपटाचे दिग्दर्शक आठवण करुन देत होते की, तू हा सीन करताना पडली होती. तू हा सीन करताना हे असे बोलली होतीस, तुला आठवते का? त्यांनी मला हे प्रश्न विचारल्यावर मी फक्त हो असे म्हणत होती. पण मला त्यावेळी या गोष्टी अजिबात आठवत नव्हत्या. कारण त्यावेळी मी माझ्याच विचारात गुंतलेली होते, असे प्राजक्ताने सांगितले.
तसेच प्राजक्ता म्हणाली, मी माझ्या आयुष्यात या सर्व घडामोडी घडल्यानंतर जेव्हा ‘वाय’ चित्रपट पाहिला तेव्हा फारच खूश होते. मी हा चित्रपट निवडून योग्य निर्णय घेतला होता याची मला खात्री झाली. चित्रपटाचा विषय खूपच छान आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या जवळच इतक्या सगळ्या गोष्टी घडतात, असे हा चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक मोठा धक्का असणार आहे.