इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही शोच्या स्टारकास्टमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये अनिता भाभीची भूमिका करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे या शोला अलविदा करणार असल्याचे कळते आहे. कारण निर्माते सध्या नेहाची जागा घेणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत. यात अनिता भाभी आणि अंगूरी भाभी या शोमधील दोन मुख्य पात्र आहेत.
विशेष म्हणजे या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आतापर्यंत अनेकदा बदलल्या गेल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, “होय, आम्ही अनिता भाभीची भूमिका करण्यासाठी नवीन अभिनेत्री घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यासाठी आम्ही ऑडिशन घेत आहोत. येत्या काही आठवड्यात आम्ही नाव निश्चित करू शकतो.“
नेहाचा एक वर्षाचा करार एप्रिलमध्ये संपणार आहे. तो नूतनीकरण करण्यास ती फारशी उत्सुक नाही. तिने शो सोडण्याचे मोठे कारण म्हणजे शूटिंग सेटवर पोहोचण्यासाठी तिला खूप लांबचा प्रवास करावा लागतो. सेटवर पोहोचण्यासाठी आणि परतण्यासाठी ती नेहमी खूप प्रवास करते. त्यामुळे याचा थेट परिणाम तिच्या आरोग्यावर होतो.
सुरुवातीला अभिनेत्री नेहा आणि शोच्या निर्मात्यांना देखील वाटत होते की, ती ही धावपळीची परिस्थिती हाताळू शकते, परंतु आता यामुळे अडचणी वाढत आहेत. विशेष म्हणजे यापुर्वी ऑगस्ट 2020 मध्ये शो सोडलेल्या सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका चांगली साकारली होती, मात्र सौम्या गेल्यावर निर्मात्यांनी नेहाला त्या भूमिकेसाठी आणले, परंतु आता ती देखील शो सोडत आहे.