इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – सासू-सून हे नातं तसं पाहायला गेलं तर कायम तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, असं असतं. घरात येणाऱ्या या नवीन सुनेला, घरातील माणसांकडून प्रेम आणि विश्वास मिळाला तर हेच नातं खूप चांगल्या पद्धधतीने बहरताना दिसतं.
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे एक लोकप्रिय जोडपं. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबियांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. अनेकदा समारंभांना त्या एकत्र हजेरी लावताना दिसतात. शिवानीच्या वाढदिवसानिमित्त सासूबाईंनी म्हणजेच मृणाल कुलकर्णी यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात सासूबाईंनी आपल्या सुनबाई शिवानीला काही प्रेमाच्या सूचना दिल्या आहेत.
मृणाल कुलकर्णी यांची सून अभिनेत्री शिवानी रांगोळे हिचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीसाठी एक खास पोस्ट लिहित तिला गोड शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी शिवानीवर असलेलं प्रेम तर व्यक्त केलंच, पण त्यासोबतच तिला काही सूचनाही केल्या आहेत. मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, “प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय मुलगी असण्याचं सुख ! ‘ घरात एक मुलगी असायला हवी ‘ म्हणजे काय याचा अर्थ आत्ता कळतोय. लगबग, गडबड, धांदल, हसण्याच्या लकेरी अशा सगळ्या गोष्टी आता आम्हाला अनुभवायला मिळत आहेत. विराजसची मैत्रीण ते आमची सून हा प्रवास तू मस्त पार पाडला आहेस. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आम्हाला तुझं कौतुक आहेच, पण नात्यांमधला गोडवा टिकवण्यासाठी तू नेहेमीच प्रयत्न करतेस हे विशेष महत्त्वाचे.
दोन्ही आज्या तुझ्यावर जाम खूश आहेत ! आपल्या माणसांवर प्रेम करणे आणि ते योग्य पद्धतीने दाखवता येणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ते आयुष्यभर करायचे असते हे नेहेमी लक्षात ठेव.” पुढे त्या म्हणाल्या, “आता हळूहळू तुझं काम सुरू झालंय. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात तब्येत सांभाळणं लक्षात ठेव. डाएटचा अतिरेक नको ! सगळं खायचं आणि व्यायाम चुकवायचा नाही ! हे वर्ष अनेकार्थानी इव्हेंटफूल गेलंय. अशीच यापुढली ही सारी वर्ष मनाजोगती जाऊदे !”
मृणाल कुलकर्णी यांच्या या पोस्टमधून त्या दोघींमधलं नातं किती सुंदर आणि घट्ट आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं. यावर अनेकांनी ही पोस्ट आवडल्याचे कमेंट्स करत सांगितलं आहे. दरम्यान, मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास ८ वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
https://www.facebook.com/photo.php?fbid=2417625998406024&set=a.107954696039844&type=3
Actress Mrinal Kulkarni Post for Shivani Viral