इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने मुंबईत नवे घर घेतले आहे. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केल्यानंतर ती परदेशात राहण्यासाठी गेली होती. मात्र, आता ती भारतात सहकुटुंब परतली आहे. म्हणूनच तिने मुंबईत नवे घर घेतले आहे. विशेष म्हणजे, हे घर विकत घेतलेले नाही तर भाड्याने घेतलेले आहे. हे घर कुठे आणि कसे आहे त्याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत…
मिडिया रिपोर्टनुसार, माधुरीने वरळी येथे हे आलिशान घर घेतले आहे. वरळीतील आलिशान अशा हाय राईज अपार्टमेंट येथे २९व्या मजल्यावर माधुरीने फ्लॅट घेतला आहे. सुमारे सहा हजार चौरस फुट क्षेत्रपळ असलेल्या या घराचे मासिक भाडे आहे तब्बल साडेबारा लाख रुपये. मुलांचे शिक्षण, तिची बॉलिवूडमधील विविध कामे आणि पतीचा वैद्यकीय व्यवसाय अशा तिघांनाही योग्य ठरेल अशा ठिकाणी हे घर निवडण्यात आले आहे. सध्या या घराचे डिझाईन सुरू आहे. प्रख्यात आर्किटेक्ट अपूर्वा मेहता यांनी हे डिझाईन केले आहे. समुद्र किनाऱ्याच्या दिशेने (सी फेसिंग) असलेला हा आलिशान फ्लॅट आहे. हॉल, डायनिंग रुम, बेडरुम, किचन, बाल्कनी, टेरेस अशा बहुविध सुविधा असलेला हा फ्लॅट सध्या सिनेजगतात चर्चेचा विषय बनला आहे. तसेच, माधुरीने तिच्या आवडी-निवडीनुसार रंगसंगती आणि घरातील अनेक बाबींना प्राधान्य दिले आहे. लवकरच ती या घरात रहायला जाणार आहे.