इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्याच्या ट्रेलरपासूनच वादात सापडला आहे. त्यातील राम – सीता तसेच रावणाची भूमिका वठवणारे कलाकार, त्यांचे कपडे या सर्वांवरुनच वाद निर्माण झाले होते. त्याचा ट्रेलर आला आणि प्रेक्षकांना देखील तो आवडला. आता चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आणि तेव्हाच पुन्हा एकदा दिग्दर्शक ओम राऊत आणि कलाकार क्रिती सेनॉन वादात सापडले आहेत. यावर क्रितीने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
काय आहे प्रकरण ?
‘आदिपुरुष’ चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याला मंदिर परिसरात किस केल्याने क्रिती सेनॉन वादात अडकली आहे. ओम आणि क्रिती या दोघांनी मंदिरात जायचे म्हणून खास कपडे घातले आहेत. याशिवाय दोघांनी लाल शाल गुंडाळली आहे. दोघे एकत्र चालत आहेत. आणि गप्पा मारत आहेत. दोघे गाडीजवळ आले. आणि ओमने क्रितीच्या गालावर किस करून तिला मिठी मारली. आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना ओम राऊत याने क्रिती सेननच्या गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
तिरुपती येथे आदिपुरुषचा फायनल ट्रेलर लाँच झाला. ७ जून रोजी ओम राऊत आणि क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी आले होते. या ट्रेलर लाँचवेळी एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा झाली. ती म्हणजे ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या गुडबाय किसची. काही वेळातच दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर व्यक्त होताना अनेकांनी हे फार चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान टीका करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते आणि तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारीही आहेत. मंदिर परिसरात हे कृत्य घडल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली. काही चाहत्यांनीही त्यांना आपण कुठे आहोत याचं भान बाळगायला हवं असा सल्ला दिला आहे.
भाजप नेते रमेश नायडू नागोठू यांनी हा व्हिडिओ शेअर करत संतप्त भावना व्यक्त केल्यात. रमेश ट्विट करून लिहितात.. “इतक्या पवित्र ठिकाणी असं वर्तन कितपत योग्य आहे? वेंकटेश्वर स्वामी मंदिरात अशाप्रकारे मिठी मारणं आणि किस करणं हे अपमानकारक आहे.” असं ट्विट त्यांनी केलं. नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं तो भाग वेगळा. याशिवाय बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी यांनीही या दोघांच्या गुडबाय किसवर आक्षेप घेतलाय. “हे निंदनीय कृत्य आहे. पती-पत्नीसुद्धा तिथे (मंदिरात) एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेलच्या रुममध्ये जाऊन ते करू शकता. तुमचं वर्तन हे रामायण आणि देवी सीता यांचा अपमान करण्यासारखं आहे”, असं ते म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून मंदिराजवळ अशा पद्धतीने जाहीर वागणुकीची गरज होती का, असा सवाल त्यांनी केला. ‘तिरुमलामधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा पद्धतीने किस करणे, मिठी मारणे हे अत्यंत अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे’, असं त्यांनी म्हटलंय.
क्रितीची पोस्ट चर्चेत
या सगळ्या वादानंतर क्रितीने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. तिरुपती मंदिर भेटीदरम्यान मिळालेलं प्रेम आणि आपुलकीबद्दल आपण भारावून गेल्याचे क्रितीने म्हटले आहे. “आभार, माझं मन सकारात्मकतेने भरलं आहे. तिरुपतीमधील पवित्र आणि शक्तिशाली ऊर्जा; काल रिलीजआधी झालेल्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांना आदिपुरुष आणि जानकीला दिलेलं प्रेम…माझ्या चेहऱ्यावर अद्यापही हास्य आहे,” असं क्रिती सेननने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
१६ जूनला चित्रपट होणार प्रदर्शित
‘आदिपुरुष’ या रामायणावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे. चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. सैफ अली खान रावणाची भूमिका निभावत आहे. प्रभासच्या करिअरमधील हा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे.
Actress Kriti Senon and Om Raut Troll Social Media