इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या तऱ्हेवाईकपणाच्या अनेक तऱ्हा आपण नेहमीच ऐकत किंवा वाचत असतो. प्रादेशिक पातळीवर याचे प्रमाण कमी असले तरी ते असतेच. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री क्रिती सिनॉन तिच्या मनमोकळ्या स्वभावमुळे आपले लक्ष वेधून घेत आहे.
चाहते किंवा मीडियाशी क्रितीचा सहज संवाद असतो. त्यात कुठेही कृत्रिमपणा नसतो. ती अगदी उत्स्फूर्तपणे सगळ्यांशी बोलत असते. नुकतीच ती तिच्या ‘शहजादा’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होतीये. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने एका चाहत्याला “मी तुझ्याबरोबर चित्रपट पाहायला येईन” असं म्हटलं.
क्रिती आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘शहजादा’ हा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यापूर्वी या दोघांनीही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. यादरम्यानच हा किस्सा घडला. एका कॉलेजमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघे गेले होते.
क्रितीने तिचा आणि कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला. यात क्रिती आणि कार्तिक चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी क्रिती म्हणते की, “व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे आणि त्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असण्याची गरज नाही.” त्यावर कार्तिक म्हणतो की ज्यांना कोणीच नाहीये त्यांनी काय करायचं?” त्यावर क्रिती म्हणते, “त्यांना मित्र-मैत्रिणी तर आहेत. त्यांच्याबरोबर ते चित्रपट पाहायला जाऊ शकतात.” क्रितीच हे म्हणणं ऐकताच प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा एक चाहता तिला म्हणाला की, मला मित्र-मैत्रिणीही नाहीत. तर क्रिती उत्स्फूर्तपणे म्हणते, “बरं मग मी येते तुझ्याबरोबर चित्रपट पाहायला.”
क्रितीचं हे म्हणणं ऐकून तिकडे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यावर कार्तिक म्हणतो, “म्हणजे आम्हाला भरपूर वेळा चित्रपट पाहावा लागेल.” यावर सर्वजण हसू लागतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर कमेंट्स करत सगळ्यांनी क्रितीच्या दिलखुलासपणाचं कौतुक केलं आहे.
Actress Kriti Sanon Will Watch Film With Fan