इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आर्यन खानची सुटका करण्यासाठी त्यांनी २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी सध्या त्यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागतंय. या सगळ्या प्रकरणात वानखेडे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पाठिंबा मिळतो आहेच. पण, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळते आहे. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ठामपणे उभी आहे. यासंदर्भात शुक्रवारी रात्री मीडियाशी बोलताना क्रांती रेडकरनं आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणणं आहे क्रांतीचं?
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हातात घेऊन क्रांती माध्यमांसमोर आली. प्रत्येक मराठी माणसासाठी शिवाजी महाराजांपेक्षा महत्त्वाचे कोणीही नाही. हेच त्यांचे सर्वात मोठे उर्जास्थान असते. त्यांच्या केवळ नामस्मरणाने तुम्हाला १०० हत्तींचं बळ मिळतं. समीर वानखेडे देशसेवा करत आहेत. त्यात माझाही खारीचा वाटा आहे. त्यांच्या पाठिशी मी नेहमीच आयुष्यभर असेन”, असा निर्धार क्रांतीने व्यक्त केला आहे.
क्रांतीनं शेअर केला खास व्हिडीओ
क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाया आणि त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता येत आहे. राष्ट्रसर्वतोपरी असा हॅशटॅगही तिनं या व्हिडीओला जोडला आहे. हे संपूर्ण प्रकरण अद्यापही निकाली निघालेलं नाही. पण, क्रांती मात्र सातत्यानं पतीची बाजू सोशल मीडियावर उचलून धरताना दिसत आहे. एखाद्या व्हिडीओच्या माध्यमातून नाव न घेता विरोधकांवर ती निशाणाही साधताना दिसत आहे.
आमची बाजू सत्याची
आमची रात्रीची झोप उडालीये, त्रास होतोय असं काही आम्हाला झालेले नाही. तुमची बाजू सत्याची असते, तेव्हा तुम्हाला चांगली झोप लागते. यातून कसं बाहेर पडायचं, समोरच्याला त्रास न देता आपण आपली बाजू कशी मांडली पाहिजे याकडे आमचं जास्त लक्ष असतं”, असंही तिने म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीतील प्रतिक्रिया काय?
“चित्रपटसृष्टीतून सगळे शांत राहून पाठिंबा देत आहेत. मी त्याचा आदर करते. मला कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही. वारंवार ते मेसेज करतात. त्यामुळे त्यांना धन्यवाद म्हणावंसं वाटतं”, असंही क्रांतीने म्हटलं आहे.
Actress Kranti Redkar on Husband Sameer Wankhede