इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे कोणत्याही वक्तव्याचे अत्यंत तीव्र पडसाद नेहमीच उमटत असतात. सोशल मीडियामुळे या गोष्टी जास्त ठळकपणे समोर येऊ लागल्या आहेत. त्यातही असे एखादे वक्तव्य जर सेलिब्रिटीने केले असेल, तर त्याची चर्चा तर होणारच. असेच एक वक्तव्य आणि ते वक्तव्य करणारा असे दोघेही सध्या चर्चेत आहेत. हे वक्तव्य करणारी व्यक्ती आहे अभिनेत्री काजोल. नुकतेच तिने राजकीय नेत्यांबाबत वक्तव्य केले आहे. कमी शिकलेले लोक देश चालवत आहेत, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. आणि त्यावरूनच ती ट्रोल होते आहे. म्हणूनच बहुधा तिने आपला उद्देश तसा नव्हता असे सांगत यू टर्न घेतला आहे.
काय म्हणाली काजोल?
काजोलने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने देशातील राजकारणावर केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “कमी शिकलेले लोक देश चालवत आहेत” असे म्हटल्यामुळे काजोलवर जोरदार टीका होत आहे. त्यानंतर तात्काळ काजोलने भूमिका बदलत ट्वीट करुन आपल्या भूमिकेवर युटर्न घेतला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोलनं आपल्याकडील राजकीय नेत्यांचे कमी शिक्षण आणि त्यांच्या दूरदृष्टीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. काजोल म्हणते, “भारतासारख्या देशात खूपच हळू बदल होत आहेत. कारण आपण आपल्या परंपरांमध्ये तसेच विचार करण्यात अडकलेले असतो. कमी शिक्षणामुळे देखील असे घडते. आपल्याकडे अनेक राजकीय नेते आहेत ज्यांचे शिक्षण फार झालेले नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टी नाही, ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळे येते. शिक्षणच तुम्हाला एखाद्या विषयाचे वेगवेगळे पैलू पाहण्याची संधी देते.” काजोलचे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले. मात्र त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. त्यामुळे काजोलने आपली भूमिका बदलली. आणि तिने ट्वीट करत ‘आपल्याला कोणत्या राजकीय नेत्याचा अपमान करायचा नव्हता. तसेच आपल्या देशात असे अनेक चांगले राजकीय नेते आहेत जे देशाला योग्य मार्गाने नेत आहेत’ असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी काजोलचा लस्ट स्टोरीज-२ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता लवकरच तिची ‘द ट्रायल’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या काजोल या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहे.