इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सध्या ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात काजोलला महत्त्वाच्या भूमिकेत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा चित्रपट खूप बोल्ड आहे. एरवी कधीही अशा भूमिकेत न दिसलेल्या काजोलला या बोल्ड भूमिकेत पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चित्रपटातील बोल्ड कंटेटवर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेच पण त्यावरून कलाकारांना देखील ट्रोल करण्यात आलं आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर महिना अखेरीस प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून होणाऱ्या टीकेवरून आता काजोलने आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणते काजोल?
काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीत कशा प्रकारे बदल झाला आहे, हे सांगितले आहे. हेच सांगताना ती म्हणते की, महिलांच्या शारीरिक गरजांना देखील प्राधान्य द्यायला हवे. पुरुषांच्या गरजांबाबत ज्याप्रमाणे बोलले जाते, त्याचप्रमाणे महिलांबाबतही मोकळेपणा हवा. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, फीमेल प्लेजरबाबत मोकळेपणाने बोलायला हवं. कारण ही आमच्या आयुष्यातील एक साधारण गोष्ट आहे. एक काळ असा होता की, या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नव्हते. आता त्याला सुरुवात झाली आहे. कारण कितीही काहीही झालं तरी हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे आणि आपण याशिवाय राहू शकत नाही. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आपण ड्रिंकिंग आणि खाण्याला नॉर्मलाइज केलं आहे त्याप्रमाणे या गोष्टीला आपण नॉर्मलाइज करायला हवं, असंही काजोल म्हणते.
‘चित्रपट हा समाजाचा आरसा’
“आधी चित्रपटांमध्ये लस्ट म्हटल्यावर दोन फुलं एकमेकांजवळ येतात. दोन गुलाबाची फुलं एकमेकांजवळ आणली जायची मग त्यानंतर महिला प्रेग्नंट राहिल्याचे दाखवले जायचे. आता आपण या सगळ्यापासून खूप पुढे आलो आहोत, असे मला वाटते. म्हणूनच लस्ट स्टोरीज 2 सारखं काही बनवण्याचा विचार केला. या स्टोरी मैत्री, मॉडर्न रिलेशनशिप्स आणि सोसायटीवर आधारीत होत्या. मला असं वाटतं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो.” आज कोणी प्रेमावर विश्वास ठेवतं असं मला वाटत नाही. कोणाला कोणासाठी मरायचे नाही. आजकाल लोक एकापेक्षा जास्त साथीदार असण्यावर विश्वास करतात. आजपर्यंत आम्ही जितक्या लव्ह स्टोरी बनवल्या आहेत, त्या सगळ्या एका वेगळ्या पद्धतीनं बनवण्यात आल्या आहेत.”
तगडी स्टारकास्ट
‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये काजोलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत कुमुद मिश्रा, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, अमृता सुभाष, अंगद बेदी आणि मृणाल ठाकूर यांचाही समावेश आहे. या सगळ्यांच्या एक वेगवेगळ्या पटकथा आहेत. अमित आर. शर्मा दिग्दर्शित एका कथेत काजोलने भूमिका साकारली आहे. तर अभिनेता कुमुद मिश्रा तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. ‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. त्यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांचा समावेश होता. आता दुसऱ्या भागातही चार वेगवेगळे दिग्दर्शक चार कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. त्यात अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांचा समावेश आहे.