मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री जया प्रदा यांचे असंख्य चाहते आहेत. चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांचा जन्म १९६२ साली आंध्र प्रदेशमध्ये झाला. त्यांचे नाव ललिता राणी होते. नंतर ते बदलून जया प्रदा असे करण्यात आले. अभिनेत्री जया यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आपली चित्रपट कारकीर्द सुरू केली होती. सध्या त्या राजकारणात सक्रिय आहेत.
चित्रपटसृष्टीत काम करताना त्यांनी सर्वच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आणि त्यांची जोडी प्रसिद्ध झाली. आजही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. मोठ्या पडद्यावर त्या प्रसिद्ध होत्या, परंतु त्यांनी खासगी जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत, त्यांना आयुष्यात अनेक वाईट अनुभव आले आहेत. त्यांच्या खासगी जीवनाशी संबंधित गोष्टी आपण जाणून घेऊयात.
अभिनेत्री जया प्रदा आणि चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा माध्यमांमध्ये होत होती. परंतु दोघेही मैत्री असल्याचे स्पष्टीकरण देत होते. परंतु १९८६ मध्ये जया यांचे करिअर शिखरावर होते, तेव्हा त्यांनी २२ जून रोजी श्रीकांत नाहटा यांच्याशी विवाह केला होता. श्रीकांत यांचे आधीच लग्न झालेले होते. त्यामुळे जया या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यामुळेच त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
श्रीकांत नाहटा यांचे चंद्रा यांच्याशी पहिले लग्न झाले होते. त्यांच्यापासून त्यांना तीन मुले आहेत. जया प्रदा यांच्याशी लग्न केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच जया यांच्याशी विवाह केला होता. जया यांच्याशी लग्न केल्यानंतरही श्रीकांत यांना पहिल्या पत्नीपासून मुले झाली. म्हणून दोघांचेही संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. विवाह झाल्यानंतरही जया यांना एकटेच राहावे लागले.
श्रीकांत यांनी जया यांच्याची लग्न केले खरे, परंतु पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने जया यांना पत्नीचा दर्जा कधी मिळू शकला नाही. श्रीकांत आणि जया यांना कोणतेही आपत्य नाही. अभिनेत्री जया यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आहे. आता त्या त्याच्यासोबत राहतात.
https://twitter.com/realjayaprada/status/1634472039988838400?s=20
https://twitter.com/realjayaprada/status/1640226806354661376?s=20