नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. तिची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशीदेखील सुरु असून, मी माझ्या कष्टाने पैसे कमावले आहेत, असं स्पष्टीकरण तिने दिलं आहे. जॅकलिन ईडीकडे काय खुलासा करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता अखेर तिने ईडीसमोर तिचे म्हणणे मांडले आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनच्या नावाचादेखील समावेश आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. “माझ्याकडे जेवढी बचत असून ती वैध आहे व त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. माझ्या बँकांमधील फिक्स्ड डिपॉजिटची रक्कमदेखील अनेक वर्षांपासून आहे. त्यावेळी मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते”, असंही तिने म्हटले आहे.
गेल्या वर्षी ईडीकडे नोंदवलेल्या जबाबात तिने म्हटलं होतं की, तिला सुकेशने गुची आणि शनेलच्या डिझायनर बॅग आणि कपडेदेखील दिले होते. इतकंच नव्हे तर तिला चंद्रशेखरकडून बहुरंगी दगडांचे ब्रेसलेट आणि दोन हर्मीस ब्रेसलेटदेखील मिळाले होते. या शिवाय सुकेशने तिला मिनी कूपर कारही भेट दिली होती, पण तिने ती परत केल्याचे ईडीला सांगितले होते. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने एका पटकथा लेखकाला तिच्या वेब सीरिजच्या प्रोजेक्टसाठी आगाऊ रक्कम म्हणून १५ लाख रुपये दिले होते.
ईडीचा आरोप आहे की गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून भेटवस्तू खरेदी केल्या गेल्याची माहिती जॅकलिनला होती तरीदेखील तिने त्या भेटवस्तू स्वीकारल्या. सुकेश चंद्रशेखर त्याची दीर्घकाळची सहकारी पिंकी इराणीली जॅकलिनला भेटवस्तू देण्यासाठी ठेवले होते. ईडीच्या आरोपपत्रामध्ये सुकेशने जॅकलिनला ५२ लाख किमतीचा घोडा आणि नऊ लाख किमतीचे एक पर्शियन मांजर तसेच १० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत.
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनच्या कुटुंबियांना १ लाख अमेरिकन डॉलर रुपये आणि कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट दिले होते. हा सगळा पैसा फसवणूक करुन सुकेशने मिळवला होता. गुन्ह्याचा पैसा भेटवस्तू देण्यासाठी वापरल्यामुळे आणि जॅकलिनने त्या स्वीकारल्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाली आहे. आतापर्यंत सुकेशवर अनेक राज्यांमधील पोलिसांबरोबरच ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागातर्फे एकूण ३२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
Actress Jaqueline Fernandez Clarification to ED Money Laundering
Sukesh Chandrashekhar Enforcement Directorate