मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे. मग ते राजकारणातील व्यक्ती असो की बॉलीवूड मधील कलाकार. ईडी कडून सध्या अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. त्यातच २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या तपासामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस काही दिवसांपासून चर्चेत आहे.
ईडीच्या तपासात यातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरनसोबत तिचे संबंधही उघड झाले आहेत. त्यामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण तिच्यावर ईडीने संशय व्यक्त केला आहे, त्यामुळेच तिला शोसाठी परदेशात जात असताना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते.
या वादामुळे जॅकलिनला नागार्जुन अक्किनेनीचा चित्रपट ‘द घोस्ट’मधून बाहेर पडावे लागले, असा दावा करण्यात आला आहे. मात्र आता खरे कारण समोर आले आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलीन या चित्रपटाचा सहभागी नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण चित्रपटासाठी ज्या तारखा आवश्यक होत्या, त्या तारखांवर जॅकलिन उपलब्ध नव्हती, त्या तारखा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच निश्चित झाल्या होत्या, त्यानंतर जॅकलीनने हा चित्रपट सोडला. मात्र जॅकलिन सध्या अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू ‘ आणि ‘बच्चन पांडे ‘ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच वेळी जॉन अब्राहमचा ‘अटॅक ‘ आणि रोहित शेट्टीच्या ‘सर्कस ‘ या चित्रपटातही जॅकलिन दिसणार आहे.
अलीकडे सुकेश चंद्रशेखरनसोबत जॅकलिन फर्नांडिसचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यातील काही इंटिमेट होते. यानंतर जॅकलिनने इंस्टाग्रामवर एक चिठ्ठी लिहून मीडियाला ती छायाचित्रे प्रसारित न करण्याची विनंती केली. या पोस्टमध्ये जॅकलिनने लिहिले की, या देशातील नागरिकांनी मला खूप प्रेम आणि आदर दिला आहे. यामध्ये माझ्या मीडियातील मित्रांचा समावेश आहे, तसेच त्याच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. मी सध्या वाईट टप्प्यातून जात आहे, पण लवकरच यातून बाहेर पडेन. मीडियातील माझ्या मित्रांना विनंती करते की, माझ्या वैयक्तिक पोस्ट मधील अशी छायाचित्रे वापरू नका. ईडीने एका प्रकरणाशी संबंधित आरोपपत्र दाखल केले आहे, यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी कॉल करण्यात आले होते.