इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शमीसोबतच्या वादांमुळे ती आपल्या मुलीला घेऊन वेगळी राहते. नुकताच रेल्वे प्रवासात आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रवासात रेल्वेतील टीसीने आपल्याला त्रास दिल्याचे तिने म्हटले आहे. टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केले, तसेच आपल्याला झोपेतून उठवल्याचे तिने सांगितले.
शमीची पत्नी हसीना जहाँ हिने यापूर्वी शमीवर देखील अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. हसीना ही सध्या तिच्या बंगाली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी रेल्वेने बिहारला गेली होती. तिचे रिझर्व्हेशन वरच्या बर्थचे होते. पण, तिच्या विनंतीवरून तिच्या सहप्रवाशाने तिला खालचा बर्थ दिला.
मालदा रेल्वे स्टेशनवर गाडी आल्यानंतर टीसी तिच्या बोगीत आले. त्यांनी आपल्याशी अत्यंत असभ्य भाषेत संभाषण केल्याचे हसीना सांगते. मला माझ्या जागेवरून उठायला सांगितले. यावेळी माझा मोबाईल देखील फेकून देण्यात आल्याचे हसीनाचे म्हणणे आहे. याबाबत तिने तात्काळ तक्रार केली. त्यावर तातडीने कार्यवाही करत पोलिसांचे एक पथक फराक्का स्टेशनवर हजर झाले. त्यानंतर तिला संपूर्ण सुरक्षेत कोलकाताला आणण्यात आले. याबद्दल तिने पोलिसांचे आभार मानले पण टीसीबद्दल रोष व्यक्त केला.
दरम्यान, मोहम्मद शमी आपल्या मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचा हसीना हिचा आरोप आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने दिलेल्या मुलाखतीत शमीवर तिने अनेक आरोप केले आहेत. त्याला आपल्या मुलीला भेटण्यात काहीच रस नाही. तसेच त्याने आपल्या मुलीसोबत वाईट वर्तन केल्याचा तिचा आरोप आहे.
Actress Hasin Jahan Share Bad Experience Railway TC