इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अत्यंत बहुचर्चित अशा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी प्रदर्शित झाला. लोक शाहिरांचा जीवनपट मांडणाऱ्या या चित्रपटाबाबत सर्वांनाच अत्यंत उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकांची त्याला चांगलीच पसंती मिळाली. आता या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंकुश चौधरी याची पत्नी अभिनेत्री दीपा परब हिने कौतुकाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.
अभिनेत्री दीपा परब आणि अभिनेता अंकुश चौधरी हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. अंकुशच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाबाबत दीपाने कमेंट करत भरभरुन लिहिले आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
“आज १ मे, महाराष्ट्र दिन…. २८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरे तर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पूर्णतः निःशब्द झाले आहे.”
“चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली. “
“बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. ह्या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्याने घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे. ‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे.”
“चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाहीत आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे, अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होईना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करीत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचे यश आहे.”
दीपाची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. यावर कमेंट करीत नेटकरी हा चित्रपट आणि अंकुशचे काम आवडल्याचे सांगत आहेत.
Actress Deepa Parab Post on Ankush chaudhari