इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांच्या तब्येतीबाबत काही दिवसांपासून माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा रंगताना दिसतात. आता स्वतः चिरंजीवी यांनीच एक ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अभिनेत्याला कॅन्सर झाल्याची चर्चा
चिरंजीवी यांना कॅन्सर झाल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. ही बातमी कळताच चाहत्यांनी काळजीने त्यांची विचारपूस केली. चाहत्यांच्या या प्रेमाबाबत त्यांचे आभार मानत स्वत: चिरंजीवी यांनीच आपल्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत. आपल्याला कॅन्सर झाला आहे, अशी अफवा पसरवणाऱ्यांबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. काही काळापूर्वी आपल्याला पॉलीप्सचे निदान झाले होते. पण त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यामुळे ते आता यातून पूर्णपणे मुक्त होऊ शकले, असे चिरंजीवी यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे.
काय आहे चिरंजीवी यांचे ट्विट?
चिरंजीवी म्हणतात, ‘काही दिवसांपूर्वी मी कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना कॅन्सरबद्दल जनजागृती आवश्यक असल्याचे म्हटले होते. जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुम्ही कर्करोग टाळू शकता, हे सांगतानाच मी स्वतः देखील तिथेच कॅन्सरची चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आले. मी इतकंच म्हणालो होतो की जर चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करून घेतली पाहिजे.’
माध्यमांवर नाराजी
मात्र, अनेक माध्यमांना ही गोष्ट कळली नाही आणि त्यांनी मला कॅन्सर झाल्याचे आणि याहीपुढे जात उपचाराने तो बरा झाल्याचे वृत्त चालवले. यामुळे गोंधळ वाढला, असे सांगत चिरंजीवी यांनी नाराजी व्यक्त केली.
चिरंजीवी हे लवकरच ‘भोला शंकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मेहेर रमेश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा ॲक्शनपट असेल. तर दुसरीकडे चिरंजीवी लवकरच आजोबा होणार आहेत. मुलगा रामचरणची पत्नी गरोदर असून त्यांच्या कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
Actor Chiranjeevi Cancer Health Update