इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राज हिचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. बंगळुरूमध्ये तिच्या चेहऱ्याची फॅट फ्री शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली. याबाबत तिने आपल्या कुटुंबीयांनाही फारशी माहिती दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत गेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या पालकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तिला 16 मे रोजी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे प्लास्टिक सर्जरीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, 16 मे रोजी सकाळी ती ‘फॅट फ्री’ शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. संध्याकाळच्या सुमारास तिला काही प्रमाणात त्रास झाला. तिच्या फुफ्फुसात पाणी जमा होऊ लागले. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण तिला वाचवता आले नाही. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे चेतनाच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गीता आणि दोरेसानी यांसारख्या मालिकांमध्ये चेतनाने काम केले. ती १६ तारखेला बंगळुरूतील शेट्टी कॉस्मेटिक सेंटरमध्ये फॅट फ्री सर्जरीसाठी गेली होती. शस्त्रक्रियेत काहीतरी गडबड झाल्याने डॉक्टरांनी तिला साडेपाच वाजता काडे रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णावर उपचार करावे, असे तेथे डॉक्टरांना सांगण्यात आले.
डॉक्टरांनी चेतनाला ४५ मिनिटे सीपीआर दिला. मात्र तिला वाचवता आले नाही. ICU इंटेन्सिविस्ट डॉ. संदीप यांनी पोलिसांना सांगितले की, चेतना हिला 6 वाजून 45 वाजता मृत घोषित करण्यात आले. त्यांनी सांगितले की शेट्टी क्लिनिकच्या डॉक्टरांना आधीच माहित होते की त्यांचा मृत्यू झाला आहे.