इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माझ्या वडिलांनी माझं वयाच्या आठव्या वर्षापासून लैंगिक शोषण केलं. आई विश्वास ठेवणार नाही, या भितीने मी पुढची आठ वर्षे हे शोषण सहन केलं, असा खळबळजनक गौप्यस्फोट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी केला आहे.
खुशबू यांची अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीजला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला. माझं बालपण फार विदारक होतं. पण मी पंधरा वर्षाची झाले तेव्हा स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोलायला लागले. त्यापूर्वीची आठ वर्ष मात्र माझी संघर्षमय होती, असेही त्या म्हणाल्या.
‘माझा पती म्हणजे माझा परमेश्वर आहे, असे आई मानायची. त्यामुळे तिच्याजवळ बोलणं शक्यच नव्हतं. ती माझ्यावर विश्वास ठेवणार नव्हती, हे मला माहिती होतं. त्यामुळे एवढी वर्ष मी थांबले,’ असे खुशबू म्हणाल्या. बालकांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी त्या म्हणाल्या, ‘एखाद्या लहान मुलावर किंवा मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा त्याची वळं आयुष्यभर त्याच्या मनावर असतात. मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही अशी गोष्ट असते जी कधीच मनावरून पुसून टाकता येत नाही.’
आईचा संघर्ष
माझ्या आईने आयुष्यभर कौटुंबिक हिंसा सहन केला. बायकोला, मुलांना मारणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी मानसिकता असलेल्या माणसासोबत आम्ही आयुष्य काढलं. त्याच्या एकुलत्या एक मुलीचं ते लैंगिक शोषण करायचे, यावरून त्यांची वृत्ती आपल्याला लक्षात येईल, या शब्दात खुशबू यांनी आपली कैफियत मांडली.
घरातून निघून गेले
मी माझ्या वडिलांविरोधात बोलायला लागले तेव्हा सोळा वर्षांची होते. त्याच काळात ते आम्हाला सोडून निघून गेले. त्यानंतर आमचं भविष्य अधांतरी होतं. एक वेळच्या जेवणाचेही हाल होते. पुढे काय होणार काहीच कळत नव्हतं, असेही त्या म्हणाल्या.
Actress and BJP Leader Khushbu on Father Sexual Abuse