इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नटखट नार, मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर जशी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच ती तिच्या बहारदार अस्सल नृत्यासाठी देखील ओळखली जाते. नुकत्याच तिच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्याने आणि त्यातील भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. यानंतर आपली अमू म्हणजेच अमृता खानविलकर हिला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. लवकरच ती डिस्नी हॉटस्टार ओटीटीवरील एका वेबसीरिजमध्ये एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
अमृता खानविलकर हिने मराठी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. राझी, मलंग या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अमृता खानविलकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
दिग्गज हंसल मेहता दिग्दर्शित लोभ, जीवन आणि दहशत, अराजकतेची कथा असलेला ‘लुटेरे’ लवकरच येत असल्याचे तिने सांगितले आहे. ‘लुटेरे’ची कथा सत्य घटनेवर प्रेरीत काल्पनिक थ्रिलर ड्रामा आहे. ही एका मोठ्या कमर्शियल भारतीय जहाजाची कथा आहे. ज्याचे सोमालियच्या तटावरून अपहरण केले जाते. इथूनच सीरिजच्या कथेला सुरूवात होते. या सीरिजचे चित्रीकरण युक्रेन, केप टाऊन आणि दिल्लीमध्ये करण्यात आले आहे.
अमृता व्यतिरिक्त या सीरिजमध्ये रजत कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अमृता खानविलकर हॉटस्टारवरील ‘लुटेरे’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला. त्यात अमृताची छोटीशी झलक पाहायला मिळाली. तिच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
Actress Amruta Khanvilkar New Web Series Reality Show
Entertainment Hot Star