मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आलिया भट्टचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी २५ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने चांगला व्यवसायही केला. एका मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि तिच्या शैलीबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेमध्ये तिच्या चालण्यापासून ते प्रत्येक गोष्टीत भरपूर स्वॅग दाखवण्यात आला आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र तशीच चालायला लागले तर बदकासारखे दिसेल.”
आलिया भट्टच्या गंगूबाईमधील अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पाहना आणि जिम सरभ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे.
हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील एका वेश्यालयात विकलेल्या गंगूची कथा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना आलिया भट्ट म्हणाली, ”जेव्हा मी माझे स्वतःचे पापाराझी व्हिडिओ पाहिले तेव्हा मला वाटले की मी बदकाप्रमाणे चालते आणि मी खूप विचित्र चालते असंही मला वाटलं. चित्रपटातलं चालण्यामध्ये खूप स्वॅग आहे.” याच मुलाखतीत आलिया भट्टने अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाचेही कौतुक केले होते. ती म्हणाली, ”जेव्हा मी पुष्पा चित्रपट पाहिला. तेव्हा मी अल्लू अर्जुनच्या स्वॅगच्या प्रेमात पडले.”
सध्या आलिया बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची कमाल दाखवत आहे. त्याचबरोबर आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटातही तिने भूमिका केली आहे. तिच्या अभिनयाचं सध्या चित्रपटसृष्टीत मोठं कौतुक होत आहे.