मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलिवूड म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये सध्या जणू काही लग्नाचा धूमधडाका सुरू आहे. एका पाठोपाठ एक अभिनेते-अभिनेत्री यांचे शुभमंगल सावधान पार पडत आहे. त्यातच आता सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती एका सेलेब्रिटी जोडप्यांच्या शुभविवाहाची. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.
विवाह स्थळापासून ते लग्नात बनवल्या जाणार्या चविष्ट पदार्थांपर्यंत सर्व लहान-मोठे तपशील जाणून घेण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक असतात. अलीकडेच या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेबाबत काही अपडेट समोर आले आहेत. एका नवीन अपडेटनुसार, आलिया भट्ट 14 एप्रिलला रणबीर कपूरसोबत सात फेरे घेणार आहे.
लग्नाच्या तारखेबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरके स्टुडिओ आणि कृष्णा राज यांचा बंगला गेल्या काही दिवसांपासून सजला आहे. आता लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांबाबत नवीन बातमी समोर आली आहे. आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्टने या लग्नाशी संबंधित नवीन माहिती शेअर केली आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला फक्त २८ पाहुणे येणार असल्याचा खुलासा राहुल भट्टने एका संवादात केला आहे. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त केवळ काही खास मित्रच लग्नात सहभागी होणार आहेत. यासोबतच दोघांच्या लग्नाच्या तारखेत आणि ठिकाणामध्येही मोठा बदल करण्यात आल्याचे स्पष्टीकरणही राहुल भट्टने दिले आहे.
आतापर्यंत बातम्या येत होत्या की आलिया भट्ट आणि रणबीरचे लग्न वास्तू अपार्टमेंट किंवा आरके स्टुडिओमध्ये होणार आहे. मात्र आता दोघांचे लग्न मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असल्याचे राहुल भट्टने स्पष्टपणे सांगितले आहे. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.
आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी कपूर कुटुंबाने चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. दोघांच्या लग्नाच्या ठिकाणी जवळपास 200 बाऊन्सर उपस्थित राहणार आहेत. इतकेच नाही तर नीतू कपूरने लग्नाच्या मेनूसाठी एक आठवडा अगोदर मुंबईत लखनऊ आणि दिल्लीतील शेफ यांना बोलावले आहे.