इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील जोड्या या प्रेक्षकांच्या फेव्हरेट असतात. या रील जोड्या रिअल लाईफमध्ये प्रत्यक्षात येतातच असं नाही. पण, प्रेक्षकांच्या मनात त्या जोड्या तशाच राहतात. अशीच एक रील लाईफ जोडी आता प्रत्यक्षात उतरली आहे. राणादा आणि पाठक बाई ही लोकप्रिय जोडी शुक्रवारी लग्नबंधनात अडकली. पुण्यात शाही थाटात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी चर्चेत आली. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अत्यंत चांगली होती. हीच केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात उतरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अखेर २ तारखेला त्यांचा विवाह संपन्न झाला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही म्हणजेच राणादा आणि पाठक बाई घराघरात पोहोचले. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.
हार्दिक – अक्षयाने पुण्यात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नविधींसाठी त्यांनी खास पारंपरिक लूक केला होता. अक्षयाने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. लग्नासाठी तिने घेतलेले दागिने देखील लक्षवेधी आहेत. अक्षयाला मॅच करत हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यांचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. या दोघांनी लग्न विधींपासून ते लग्नापर्यंत साऱ्या कार्यक्रमाचे फोटो तात्काळ सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळेच चाहत्यांनाही त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं.
मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक – अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यावेळी अक्षया अर्थात बायकोसमोर राणादाने लावणीवर ठेका धरला आणि उपस्थितही चकित झाले.
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयेला साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्या लग्नपत्रिकेचे फोटोही समोर येत होते. या दोघांच्याही हातावर एकमेकांच्या नावाची रंगलेली मेहंदी कौतुकाचा विषय ठरला होता. दोघांच्याही घरी लग्नाची धामधूम दिसत होती. पुण्यात ते दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/ClqRlw8SIXe/?igshid=MTI5NDc2ZGU=
Actress Akshaya Devdhar Actor Hardik Joshi Wedding
Entertainment