मुकुंब बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एकेकाळी दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर यासारख्या अभिनेत्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. तशाच काही अभिनेत्रींनी देखील तो काळ गाजवला. यामध्ये मधुबाला, मीनाकुमारी, वहिदा रहमान यांच्यासारखाच आणखी एक अभिनेत्री म्हणजे आशा पारेख
होय. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा पारेख सध्या चित्रपटांपासून दूर आहेत. ती पूर्वीच्या काळातील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. आशा पारेख यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांशिवाय ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आशा पारेख आज ७९ वर्षांच्या आहेत. त्यांनी आतापर्यंत लग्न केलेले नाही. मात्र आता त्यांनी आपल्या लग्नाबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
आशा पारेख यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. यादरम्यान त्यांनी लग्न न करणे किंवा स्वतःची मुले असण्याबाबत बरेच काही सांगितले आहे. आशा पारेख म्हणाल्या की, आजपर्यंत आपण लग्न केले नाही आणि मूलबाळ नाही याची खंत वाटत नाही. ‘मला वाटतं लग्न करायचे माझ्या नशिबात नव्हते. खरे सांगायचे तर मला लग्न करून आई व्हायला आवडले असते, पण तसे व्हायचे नव्हते. मात्र, मला त्याची अजिबात खंत नाही. याशिवाय या ज्येष्ठ अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच काही सांगितले. आशा पारेख यांनी १९५२ मध्ये बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी घराना, जिद्दी, उपकार, आया सावन झुमके, कटी पतंग, मेरा गाव मेरा देश, कालिया आणि घर की इज्जत सही यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आशा पारेख या ६० आणि ७० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री होत्या. नुकतीच ती तिच्या जुन्या मैत्रिणी वहिदा रहमान आणि हेलनसोबत सुट्टीचा आनंद लुटल्यामुळे चर्चेत आली होती. या तिन्ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा एकमेकांसोबत त्या वेळ घालवतात. अलीकडेच, या तिन्ही अभिनेत्रींचे काही अतिशय गोंडस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये त्या सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.