मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत हिने केलेले विधान देशभर वादात सापडले असतानाच आता त्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही उडी धेतली आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात कंगना म्हणाली की, भारताला १९४७ स्वातंत्र्य नाही मिळालं तर ती भीक होती. तिच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. अशातच आता गोखले यांनी त्यांचे मत मांडले आहे. कंगना ही खरे बोलली. भारताला १९४७ मध्ये भीकेच्या स्वरुपातच देश मिळाला, असे गोखले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता गोखलेही वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
गोखले यांनी वयाची पंच्याहात्तरी पूर्ण केली आहे. त्यानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोखले म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवे. तरंच बरं होईल. भारताला कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालेले नाही. ते भिकेनेच मिळाले आहे. आपले अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतीवीर फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. अनेक जण फक्त बघत राहिले, असा आरोपही गोखले यांनी केला आहे. यावेळी गोखले यांनी पंतप्रधान मोदी यांची मुक्तकंठाने कौतुक केले. भारत देश हा भगवाच राहिला पाहिजे. आपला देश कधीही हिरवा होणार नाही, असेही गोखले म्हणाले.