इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत येण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथील ईडी कार्यालयात नुकतीच त्याची चौकशी झाली. देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटासाठी मिळालेल्या पैशांबाबत शंका निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी फेमाच्या (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) चौकशी संदर्भात विजय ईडीसमोर हजर झाला होता.
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘लायगर’ चित्रपट आला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. मात्र, या निमित्ताने आता चित्रपट निर्मितीवरील खर्चाची चौकशी सुरू झाली आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा विजय देवरकोंडा चर्चेत आला आहे. याच संदर्भात ईडीने त्याची चौकशी केली आहे. ‘लायगर’ चित्रपटाच्या गुंतवणूकदारांमध्ये या फंडाबाबत अनेक शंका आहेत. ईडीने अलीकडेच पुरी जगन्नाथ आणि त्यांची व्यावसायिक भागीदार चार्मी कौर यांची जवळपास १२ तास चौकशी केली.
१२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये ‘लायगर’ सिनेमा अमेरिकेतील लास व्हेगास येथे शूट करण्यात आला. बॉक्सर माईक टायसन देखील या चित्रपटात दिसला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट सपशेल अपयशी ठरला. ‘लाइगर’मध्ये विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, राम्या कृष्णन आणि माइक टायसन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २५ ऑगस्ट २०२२ रोजी पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. ‘लाइगर’ हा स्पोर्ट्स ड्रामा होता. सिनेमाचं बरचंस शूटिंग यूएसमध्ये लास वेगास येथे झालं होतं. सिनेमाचं देशभरात जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं.
‘लायगर’ चित्रपटासंदर्भात कथित पेमेंट आणि फंडच्या स्रोताची ईडी चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटासाठी फंडचे स्रोत, त्याला मिळालेले मानधन यासाठी विजय देवरकोंडा आणि अमेरिकन बॉक्सर माईक टायसनसह इतर कलाकारांची चौकशी केली जात आहे. काँग्रेसचे नेते बक्का जडसन यांनी चित्रपटातील संशयास्पद गुंतवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला.
बक्का जडसन यांच्या तक्रारीनुसार, काही राजकीय नेत्यांनी ‘लायगर’मध्ये पैसेही गुंतवले होते. गुंतवणूकदारांसाठी त्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असल्याचा दावाही त्यांनी केला. अनेक कंपन्यांनी चित्रपट निर्मात्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. याच संदर्भात सध्या ईडी चौकशी करते आहे. १९९९ च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत, चित्रपट बनवण्यासाठी परदेशी स्रोत वापरणं हा गुन्हा मानला जातो. या चित्रपटासाठी आलेल्या फंडिंगमध्ये ‘फेमा’चे काही उल्लंघन झाले आहे का याचा तपास सुरू आहे.
Actor Vijay Devarkonda ED Enquiry
Entertainment Liger Movie