इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता विकी कौशल हा बॉलीवूडमधील एक संवेदनशील नट. ‘उरी’, ‘ राझी’ अशा अनेक चित्रपटातून आपण ते अनुभवलं आहे. इतरवेळी देखील फारसा कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा विकी कतरीना कैफसोबत लग्न झाल्यावर एकदम प्रकाशझोतात आला. आपल्या नवऱ्याचं कौतुक प्रत्येक बायकोला असतं, तसं ते कतरिनाला देखील आहे. विकीचं कौतुक करताना कतरीना कधीच थकत नाही. आणि आता महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील विकीचे कौतुक केले आहे.
दमदार अभिनय आणि हटके भूमिका हा विकीचा अंदाज आहे. अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो. विकी कौशल हा सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘मसान’ या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली, यातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले. बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीदेखील त्याचे कौतुक केले होते. अमिताभ बच्चन यांच्याबाबत विकीने एक किस्सा सांगितला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा अमिताभ बच्चन यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. यात अनेकदा बॉलीवूडमधील कलाकार हजेरी लावत असतात. या कार्यक्रमात नुकतेच विकी कौशल, कियारा अडवाणी आले होते. तेव्हा विकीने अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची आठवण सांगितली. तो म्हणाला, “एके दिवशी सकाळी माझ्या वडिलांनी मला बोलवले आणि त्यांनी मला त्यांचा फोन दाखवला. त्यावर दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचा मेसेज होता. तो मेसेज मी माझ्या मोबाईलवर टाईप करून घेतला. त्यानंतर मी झोपू शकलो नाही. रात्रभर मी हाच विचार करत होतो की अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपूर्ण दिवसातील काही क्षण माझा विचार केला. हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता, अशा भावना विकीने यावेळी व्यक्त केल्या.
‘मसान’मध्ये विकी कौशल व्यतिरिक्त, संजय मिश्रा, ऋचा चढ्ढा आणि श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पंकज त्रिपाठी यात पाहुणे कलाकार म्हणून होते. २०१५मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. दरम्यान विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर यांचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट आता डिस्ने हॉटस्टारवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. प्रदर्शित होऊन अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट ओटीटी माध्यमावर सुपरहिट ठरला आहे.
Actor Vicky Kaushal Big B Amitabh Bachchan Message
KBC