विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘ढाई किलो‘च्या डायलॉगमुळे सदैव चाहत्यांच्या लक्षात असलेला अभिनेता सनी देओल एक यशस्वी नट म्हणून ओळखला जातो. मात्र त्याचे करीयरही एकेकाळी डुबलेले होते. पण एका अॅक्शन चित्रपटाने त्याचे करियर सावरले आणि त्याचे नाव होते ‘अर्जून‘.
सलीम–जावेदने 1973 मध्ये चित्रपटसृष्टीला अमिताभच्या रुपात एक अँग्री यंग मॅन दिला. त्यानंतर 12 वर्षांनी ही जोडी तुटली. सलीम व जावेद वेगवेगळे झाले खरे, पण त्यांच्यातील जोश अद्याप कायम होता. अनेक वर्षांनंतर पोस्टरवर सनी देओलचा अँग्री फेस बघायला मिळाला. पण यावेळी खाली लिहीले होते… ‘रिटन बाय जावेद‘.
सलीम यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर गीतकार म्हणून जावेद अख्तर खूप गाजले आणि आता तर त्यांची बातच न्यारी आहे. पण कथालेखक किंवा पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांच्यावर विश्वास दाखविण्याचे काम अनेक वर्षांनी दिग्दर्शक राहुल रावेल याने केले. त्याने सनी देओलचा पहिला सिनेमा ‘बेताब‘ जावेद अख्तर यांच्याकडून लिहून घेतला. त्याने माहोल केला. त्यानंतर सनी देओलचे ‘सनी‘, ‘मंजिल मंजिल‘ आणि ‘सोहनी महिवाल‘ हे तिन्ही रोमँटिक चित्रपट बॉक्स आफिसवर आपटले. पण त्यानंतर राहुल रावेल याच्याच चित्रपटाने सनी देओलचे करीअर सावरले. त्याने ‘अर्जून‘मध्ये दमदार कमबॅक केले. त्याच सेटवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सनी देओलला बघितले आणि प्रभावित झाले होते.
ममैय्या केरो केरो केरो मामा
1985मध्ये रिलीज झालेला ‘अर्जून‘ आणि त्यातील गाणी प्रेक्षक विसरलेले नाहीत. ‘ममैय्या केरो केरो केरो मामा‘ या गाण्याने तर चांगलाच माहोल केला. या गाण्यातील ‘दुनिया माने बुरा तो गोली मारो‘ या ओळीने तर तरुणांच्या मनात स्थानच मिळवले होते.
वर्तमानपत्रातून सूचली कल्पना
राहुल रावेल आणि जावेद अख्तर एकदा लोणावळा येथे होते. एक दिवस पहाटे चारच्या सुमारास जावेद अख्तर यांनी राहुल रावेलला झोपेतून उठवले. सिनेमासाठी एक दमदार कल्पना सूचली आहे, असे त्यांनी राहुलला सांगितले. त्या काळात पठाण गँग आणि दाऊद गँगची मुळं मुंबईत पसरायला लागली होती आणि बेरोजगार तरुणांचा ते वापर करू लागले होते. एकूणच परिस्थितीवर टाइम्स आफ इंडियामध्ये प्रकाशित बातमी वाचून जावेद अख्तर यांना कथा सूचली आणि राहुललासुद्धा ती आवडली.