मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते व एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते.
मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय आणि परखड विचार मांडणारे अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शरद हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. आपली मतं ते निर्भीडपणे ट्विटर, फेसबुकवर मांडत असतात. पण त्यांनी नुकताच शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. हा फोटो त्यांच्या लेकीसोबतचा आहे.
शरद पोंक्षे यांनी मुंबई विमानतळावरचा लेकीसोबत फोटो शेअर केलाय. त्यांची लेक सिद्धी आता परदेशात शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. तिला पायलट व्हायचे आहे. लेकीला परदेशात पाठवताना शरद पोंक्षे भावुक झाले होते. त्यांनी सिद्धीसोबत फोटोशेअर करत तिला बाय म्हटलं आहे. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं त्यांनी म्हटले आहे.
अभिनेते शरद पोंक्षे गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. मराठी कलाविश्वातील गुणी आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. उत्तम अभिनयासह शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेकदा जाहीरपणे एखाद्या विषयावर भाष्य करत त्यांनी त्यांचं मत नोंदवले आहे. परिणामी, बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
गेली काही वर्षे शरद पोंक्षे यांच्या कुटुंबियांना अवघडच गेली होती. पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय खंबीरपणे त्यांना साथ दिली. अशा परिस्थितीत अभ्यास करून त्यांची लेक आता उच्च शिक्षणासाठी परदेशात निघाली आहे. तिनं बारावीच्या परिक्षेतही चांगले गुण मिळवले होते.वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना लेकीनं मिळवलेल्या यशाबद्दल शरद पोंक्षे यांना कौतुक होतं. त्यावेळी त्यांनी खास पोस्ट शेअर केली होती.
शरद पोंक्षे यांचे आपल्या कुटुंबाप्रती अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मुलाचे नाव स्नेह तर मुलीचे नाव सिद्धी आहे. शरद पोंक्षेचा मुलगा स्नेह हादेखील वडिलांप्रमाणे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. शरद पोंक्षे यांना एक मुलगी असून ती कलाविश्वापासून कोसोदूर असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे ती एका वेगळ्या क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे. तर त्यांची मुलगी सिद्धीला वैमानिक व्हायचे आहे. शरद पोंक्षे यांना कर्करोग झालेला असताना सिद्धीने त्यांची प्रचंड सेवा केली. विशेष म्हणजे दररोज रुग्णालयात ये-जा करुनही ती १२ वीत ८६ टक्के मार्क मिळवत उत्तीर्ण झाली.
Actor Sharad Ponkshe Daughter Post Social Media