मुंबई – बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या प्रेमप्रकरणाचे आणि लग्नाचे अनेक किस्से सांगितले जातात. त्याच्या रंजक कथाही आहेत, अशीच एक आगळीवेगळी कथा प्रसिद्ध अभिनेते तथा बॉलिवूडचे खलनायक शक्ती कपूर आणि त्यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांच्या बद्दलची आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकाच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या अभिनेता शक्ती कपूरची प्रेमकथा अगदी फिल्मी स्टाइलच आहे. त्यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे ही देखील ८० च्या दशकाची अभिनेत्री आहे. चला तर मग जाणून घेऊ या शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांच्या फिल्मी प्रेमकथेबद्दल …
शक्ती आणि शिवांगी यांचे १९८२ साली लग्न झाले. त्यावेळी शिवांगी ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री होती. १९८० साली ‘किस्मत’ चित्रपटाने त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रणजित मुख्य भूमिकेत होते. शक्ती कपूरनेही या चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. शक्ती आणि शिवांगी यांना याची कल्पना नव्हती की हा चित्रपट दोघांचेही भविष्य बदलणार आहे.
शिवांगी आणि शक्ती दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले. वास्तविक जेव्हा या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली तेव्हा दोघेही आपल्या करिअरशी झगडत होते, पण यानंतर चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हा चित्रपटही हिट ठरला. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शक्ती आणि शिवांगी यांना लग्न करणे इतके सोपे वाटत नव्हते. कारण शिवांगीचे कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते. वास्तविक, शक्ती कपूर अनेक चित्रपटात व्हिलनच्या म्हणजेच निगेटिव्ह भूमिका साकारत असे. बर्याच चित्रपटांमध्ये बलात्कारांचे दृश्यही त्यांनी केले. यामुळे लोक त्यांचा द्वेष करीत आणि शिवांगी तर त्याच्या प्रेमात पडली होती.
शिवांगीच्या घरच्यांचाही या लग्नाला विरोध होता. त्यामुळे शक्ती आणि शिवांगी यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवांगी फक्त १८ वर्षांची होती. दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी शिवांगी आई झाली. तिने मुलगा सिद्धांत याला जन्म दिला. यानंतर श्रद्धाचा जन्म झाला. लग्नानंतर शिवांगीने चित्रपटात काम करणे बंद केले. ती कुटुंबातच व्यस्त झाली. आता त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, तर मुलगा सिद्धांत कपूर देखील अभिनेता आहे.