इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहेत. आता या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे. खुद्द आर्यन खाननेच याची माहिती दिली आहे. मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आर्यनने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र वडील शाहरुख आणि बहीण सुहाना यांच्याप्रमाणे तो अभिनय करणार नाही तर लेखन क्षेत्रातून पदार्पण करणार आहे.
आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या स्क्रीप्टचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. दरम्यान, त्याच्या या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबद्दलची माहिती अद्याप उघड झालेली नाही. शाहरुख आणि गौरी यांचं प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘लेखनाचं काम पूर्ण झालं, आता ॲक्शन म्हणण्यासाठी उत्सुक आहे’, असं कॅप्शन आर्यनने या फोटोला दिलं आहे. आर्यनने हा फोटो पोस्ट करताच त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या. ‘हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे’, असं आर्यन खानची आई गौरी खान हिने म्हटलं आहे. तर अनन्या पांडेची आई भावना पांडे हिने ‘खूप प्रेम’ अशी कमेंट केली.
लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आर्यन हा शाहरुखच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये मदत करत होता. यावर्षी त्याने बहीण सुहाना खानसोबत दुबईत पार झालेल्या इंटरनॅशनल लीग टी-20 ट्रॉफी लाँचलाही हजेरी लावली होती. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यनला अटक झाली होती. बरेच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी त्याला आता क्लीन चिटही मिळाली आहे.
Actor Shahrukh Khan Son Aryan Bollywood Entry