इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलीवूडमध्ये आजही किंग खान अर्थात शाहरुख खानची चलती आहे. त्याच्या केवळ नावावर चित्रपट चालतो, अशी परिस्थिती अजूनही आहे. शाहरुखच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे किंग खानच्या चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा असतेच. शाहरुखचे सध्या तीन चित्रपट येणार आहेत. ही जरी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असली तरी त्यातील आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक करत उत्सुकता प्रदर्शित केली होती.
किंग खानचे ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ असे तीन चित्रपट येत आहेत. त्यातील ‘जवान’ चित्रपटचे विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक जेटली हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. आता याच चित्रपटावर संकटाचे वादळ घोंघावू लागले आहे. या चित्रपटाची कथा तामिळ चित्रपट ‘पेरारसू’ची असून ती जेटलींनी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह दक्षिणेतील या चित्रपटाचे निर्माते माणिकम नारायण यांनी तामिळनाडू फिल्म प्रोड्युसर्स काउन्सिलकडे याबाबत तक्रार केल्याचे समजते.
‘पेरारसू’ हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेचे हक्क माणिकम नारायण यांच्याकडे आहेत. ‘जवान’ या चित्रपटाची एकंदर कथा ही ‘पेरारसू’ सारखीच असल्याचे माणिकम नारायण यांनी म्हटलं आहे. ‘पेरारसू’ या चित्रपटात विजयकांतने पेरारसू आणि इलवारसू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. ‘जवान’ या चित्रपटातही शाहरुख खानचा डबल रोल असल्याचे समजत आहे. या परिस्थितीमुळे या चित्रपटाबाबत काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर तामिळनाडू फिल्म प्रोड्युसर्स काउन्सिल या प्रकरणाचा ७ नोव्हेंबरनंतर तपास करतील असे सांगण्यात आलं आहे.
आपल्या भूमिकेला न्याय देण्यात शाहरुख कायम ओळखला जातो. त्यात ‘जवान’ या चित्रपटामधील त्याचा पट्ट्या बांधलेला लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत साऊथची अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती असतील तर दीपिका पदुकोण यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. हिंदीसह तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
Actor Shahrukh Khan Jawan Film Controversy
Entertainment