मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यामुळे सुपरस्टार शाहरूख खान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गेला काही काळ खूपच आव्हानात्मक होता. आता त्या सर्वांच्या आयुष्याची गाडी हळूहळू रूळावर येत आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर शाहरूख खान एका शूटिंग सेटवर दिसला आहे. त्या ठिकाणावरील शाहरूख खानचा फोटो व्हायरल होत असून, त्याचे चाहते खूपच आनंदित झाले आहेत.
शाहरूखच्या फॅन क्लबवर फोटो शेअर
इन्स्टाग्रामवर शाहरूख खानचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये शाहरूख आपल्या अंगरक्षकासोबत सेटवर शूटिंगसाठी जात असल्याचे दिसत आहे. शाहरूखने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि गॉगल परिधान केल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये शाहरूख खान पाठमोरा जास्त दिसत आहे. शाहरूख खानच्या फॅन क्लबवर हे फोटो शेअर करण्यात आले आहे. शाहरूख आपल्या पठाण या चित्रपटाच्या शूटिंग करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर काही वृत्तांनुसार, तो एका जाहिरातीच्या शूटिंग करण्यासाठी पोहोचला होता. परंतु यासंदर्भात अद्याप कोणत्याही अभिनेत्याकडून किंवा निर्मात्यांकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ते काहीही असो शाहरूख खानचे फोटो पाहून त्याचे चाहते खूपच आनंदित झाले आहेत.
पठाणचे शूटिंग स्पेनमध्ये नियोजित?
ऑक्टोबरमध्ये पठाण या चित्रपटाची शूटिंग स्पेनमध्ये होणार होती. परंतु आर्यन खानला अटक केल्यानंतर शूटिंग रद्द करण्यात आली होती. पिंकव्हिला संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, पठाणचे शूटिंग आता पुन्हा सुरू झाले आहे. या चित्रपटात शाहरूख सोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शाहरूख या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. २०१८ मधील झिरो या चित्रपटात शाहरूख खान दिसला होता.