पनवेल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेलिब्रिटींइतकेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलही लोकांना फार कुतूहल असते. त्यातही स्टार किड्स म्हणजे तर आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. ते कोणत्या शाळेत जातात इथपासून ते त्यांच्या आवडी निवडी काय याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यांनी काहीही केले तरी त्याचे कौतुक होते. असेच सध्या शाहरुख खानच्या मुलीची चर्चा सुरू आहे. कारण आहे ते तिने खरेदी केलेल्या जमिनीचे. सुहानाचे वडील – शाहरुख खानची अलिबागमध्ये आधीच मालमत्ता आहे.
शेतीसाठी जमिनीची खरेदी
सुहानाने नुकतीच शेतीसाठी जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुहानाने अलिबागच्या थळ गावात जमीन घेतली आहे. जमिनीचे क्षेत्रफळ दीड एकर असल्याचे सांगितले जाते. दीड एकरपैकी २२१८ चौरस फुटांवर सध्या बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसून, या जागेची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याची चर्चा आहे.
किंमत १२ कोटी ९१ लाख
सुहानाने शेतीसाठी खरेदी केलेल्या या दीड एकर जमिनीची किंमत तब्बल १२ कोटी ९१ लाख रुपये आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित नोंदणीही १ जून रोजी झाल्याचे सांगितले जात आहे. सुहानाने ७७ लाख ४६ हजार रुपये मुद्रांक शुल्कही जमा केले आहे. अधिकृत कागदपत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार तीन विविध बांधकामांमध्ये विभागलेली जमीन तिनं खरेदी केली आहे. ही अनुक्रमे १७५० चौरस फूट, ४२० चौरस फूट, ४८ चौरस फूट कार्पेट एरियामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. अंजली खोटे आणि इतर दोन कुटुंबासोबत तिनं हा व्यवहार केला असून अलिबगमधील थळ येथे तिनं ही जमीन खरेदी केली आहे.
सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रतीक्षा
काही दिवसांपासून सुहाना तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे प्रसिद्धीझोतात आहे. सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खानचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र, चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच पूर्ण होणार आहे. सुहानाचा पहिला चित्रपट ‘द आर्चिज’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘द आर्चिज’मधून सुहाना खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.