इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध हास्यकलाकार आणि निर्माता – दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे नुकतेच निधन झाले. कौशिक यांच्या जाण्याने कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असल्याचे चित्र आहे. हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांमध्ये त्यांचा समावेश होतो.
कौशिक यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर मात्र, यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येऊ लागले. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालू यांचे नाव समोर येऊ लागले. मालू यांच्या दुसऱ्या पत्नीने हा सगळा एका कटाचा भाग असल्याचं म्हटलं आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली. दरम्यान, हे विकास मालू नक्की आहेत कोण याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालू हे नाव चर्चेत आलं आहे. उद्योग जगतातलं हे मोठं नाव आहे. विकास मालू कुबेर ग्रुप या ग्रुपचे मालक आहेत. सध्या हा ग्रुप ४५ क्षेत्रांमध्ये असून ५० देशांमध्ये त्याच्या शाखा आहेत. विकास मालू स्वतः उत्तम उद्योजक म्हणून ओळखले जातात. कुबेर ऍक्वा मिनिरल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ते संचालक होते. सध्या ते वर्धमान इंटरनॅशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये संचालक आहेत.
विकास मालू यांच्या दुसऱ्या पत्नीने सतीश कौशिक यांचा मृत्यू हा एक कट असल्याचा दावा केला आहे. विकास मालूने गुंतवणुकीसाठी सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रूपये घेतले होते. सतीश कौशिक काही महिन्यांपासून त्यांच्याकडे पैसे मागत होते. मात्र विकास मालू ते परत करत नव्हते असा गौप्यस्फोट देखील या महिलेने केला आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या महिलेने असा दावा केला की, करोना काळात सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रूपये घेतल्याचे विकास मालू यांनीच मला सांगितले होते. ते पैसे बुडाले. तेच आता सतीश कौशिक परत मागत होत, असे तिचे म्हणणे आहे.
विकास मालू यांना उधार घेऊन पैसे द्यावे लागू नये म्हणूनच त्यांनी सतीश कौशिक यांना आपल्या मार्गातून दूर केलं आहे. तर दुसरीकडे विकास मालू यांनी हे आरोप फेटाळले आहेत. विकास मालू यांच्या म्हणण्यानुसार, सतीश कौशिक आणि त्यांच्या कुटुंबाशी माझे ३० वर्षांपासूनचे संबंध आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूमुळे आम्हालाही धक्का बसल्याचे विकास मालू सांगतात. आता कौशिक यांच्या मृत्यूनंतर मला विनाकारण बदनाम केलं जातं आहे असं विकास मालू यांनी स्पष्ट केलं आहे.
१९८५ मध्ये कुबेर ग्रुपची सुरूवात विकास मालू यांचे वडील मूलचंद मालू यांनी केली. हा ग्रुप आज तंबाखू व्यवसायातला सर्वात मोठा ब्रँड आहे. कंपनीचे देशभरात १४ लाख व्हेंडर आहेत. तसंच या कंपनीची उत्पादनं बाहेरच्या देशांमध्येही पाठवली जातात.या शिवाय कुबेर ग्रुप मसाले, चहा पावडर, हिंग, डाळी, तांदूळ, लोणचे, पापड, केशतेल, धूप-अगरबत्ती, सुपारी, माऊथ फ्रेशनर या उत्पादनांच्या व्यवसायातही आहे.
Actor Satish Kaushik Death Case Who is Vikas Malu