मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर असावे अशी अपेक्षा असते, यासाठी ते बँकेकडून कर्ज घेऊन तर EMI देखील भरतात, परंतु घराचे हप्ते भरताना देखील काही वेळा मोठी आर्थिक ओढाताण होते. मात्र सेलिब्रिटी असलेल्या व्यक्तींची गोष्ट वेगळी असते, त्यातच बॉलीवूड मधील कलाकार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बाबत काही सांगायलाच नको! मुंबईसारख्या ठिकाणी तर सर्वसामान्य नागरिक घर घेण्याचा विचार देखील करू शकत नाही, परंतु सेलिब्रिटी आणि त्यांचे नातेवाईक या मायानगरीत सहजपणे घर घेऊ शकतात, हे देखील कोट्यावधी रुपयांच्या किमतीत, कारण ते त्यांना सहज शक्य असते. प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने मुंबईत 1750 स्क्वेअर फुटाचे घर खरेदी केले आहे, त्यामध्ये 4 कार पार्किंग देखील आहे.
अर्पिताने हे घर 10 कोटी रुपयांना खरेदी केले असून ते घर मुंबईत खार पश्चिम येथे आहे. हे घर फ्लाइंग कार्पेट बिल्डिंगच्या 12व्या मजल्यावर आहे. त्याची नोंदणी झाली, तेव्हा अर्पिता खान शर्माने 40 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. अर्पिता खान शर्मा यांच्याकडे सध्या थ्री आणि फोर बीएचके घरे आहेत आणि चौरस फुटांची किंमत 60 हजार ते 65 हजारांपर्यंत आहे. ही मालमत्ता मुंबई जिमखान्याजवळ असून ती भाड्याने दिली आहे, तसेच तिचा भाऊ सलमान खानने मुंबईत एक प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे, त्याचे मासिक भाडे 95 हजार रुपये आहे. एका मुलाखतीत अर्पिता खान शर्मा म्हणाली होती की, मी माझ्या भावाच्या अगदी जवळ आहे. कारण आम्ही दोघे जवळजवळ एकत्र वाढलो आहोत. मला सलमान भाईबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. दरम्यान, अर्पिता खान शर्माने 2014 मध्ये अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले. दोघांनाही दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अहिल आणि मुलीचे नाव आयत आहे.