मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – अभिनेता आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे सतत चर्चेत असताना आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे सरकत आहे आणि यासोबतच चाहत्यांची प्रतीक्षा मात्र संपत नाहीये. लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून आमिर आणि सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असे जेव्हा रसिकांना कळले तेव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र ताज्या माहितीनुसार, लाल सिंग चढ्ढा या चित्रपटामध्ये सलमान खानची झलक दिसणार नाही. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार होता पण आता तसे होणार नाही.
आमिर खान निर्मित लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या तारखांमुळे सलमान खानने कॅमिओ करण्यास नकार दिला आहे. बॉलीवूड हंगामाच्या ताज्या अहवालानुसार, आमिर खान हा सलमान खानच्या तारखांनुसार लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटाच्या शुटींग नियोजनावर पाणी फेरले गेले. सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळेच त्याने लाल सिंग चढ्ढा चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच सलमान खान आणि कतरिना कैफ मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. सलमान खान सध्या टायगर३ भाग बनवण्यात व्यस्त आहे. तो कतरिनासोबत दिल्लीला रवाना झाला आहे. टायगर 3 चे उर्वरित शूटिंग दिल्लीतच पूर्ण होणार आहे. तसेच, आमिर खानने स्पष्ट केले की, लाल सिंग चढ्ढा यांच्यासाठी काही काम बाकी आहे. त्यामुळे तो एप्रिलमध्ये चित्रपट प्रदर्शित करू शकणार नाही. आता हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत करिना कपूर खान दिसणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.