मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत सलमानचे नाव जोडले जात असून, त्यांनी दोघांनी लग्न केल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, या दोघांचे फोटो सोशल मीडियावर फिरत असल्याने दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे लोकांना वाटू लागले आहे. पण या चित्राचे सत्य वेगळेच आहे. फोटोशॉप वापरून हे चित्र तयार करण्यात आले असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सलमान – सोनाक्षीच्या लग्नाची ही अफवाच आहे. सलमान खान अजूनही अविवाहित असून, तो युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
बॉलीवूड अभिनेते – अभिनेत्रींची नावे एकमेकांसोबत जोडले जात असल्याचे नेहमीच दिसून येते. आता सलमान खान – सोनाक्षी सिन्हाचं नाव जोडलं जात आहे. अनेक दिवसांपासून सोनाक्षीबद्दल बातम्या येत आहेत की ती झहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, सोनाक्षीनेही याचा इन्कार केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले की, तिच्या आणि झहीरमध्ये प्रेमाचे नाते नसून ते फक्त चांगले मित्र आहेत. रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी ऐकून आम्ही दोघेही खूप हसलो, असे सोनाक्षीने या मुलाखतीत सांगितले.
२०१०मध्ये सलमान खानने सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. या दोघांची मोठ्या पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर राउडी राठौर, दबंग २, लुटेरा, बुलेट राजा, हॉलिडे, तेवर, अकिरा, कलंक, खानदानी शफाखाना, दबंग ३, मिशन मंगल यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय सोनाक्षी नुकतीच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती. तिचं सलमानसोबतच्या लग्नाच्या बातम्या सध्या तरी केवळ अफवा आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. पण चाहत्यांना सलमानच्या लग्नाची खूप उत्सुकता आहे. बिग बॉस १५च्या एका एपिसोडमध्ये सलमानने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सलमान हे बॉलिवूडमधील नाव आहे ज्याने अनेक अभिनेत्रींना लॉन्च केले आहे. त्यापैकी अनेकांशी सलमानचे नाव जोडले गेले आहे. ज्यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, जरीन खान, कतरिना कैफ यांच्या नावाचाही समावेश आहे.