इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘विक्रमवेधा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. चित्रपट येण्यापूर्वीच याबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या बहुचर्चित चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात निर्मात्यांना याचा मोठा फटका बसला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने सतत फ्लॉप होणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांबद्दल मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्याने मुख्य कलाकार म्हणून भरमसाठ फी घेतल्याचंही सांगितलं आहे.
“बिग बजेट चित्रपटाच्या कमाईचे आकडे जेव्हा कमी दिसतात, तेव्हा ही बाब फार नैराश्याची असते. ‘विक्रम वेधा’सारखा चित्रपट चांगली कमाई का करू शकला नाही, हे माझ्यासमोरचं मोठं कोडं आहे. खरं तर या चित्रपटाकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.” अशी खंत सैफ व्यक्त करतो.
प्रेक्षकांची आवड निवड बदलते आहे का, असा प्रश्न पडतो आहे. त्यांना काय आवडतं आणि काय नाही हेच कोणाला कळत नाही. काही कलाकार एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. ही रक्कम फारच असते. कलाकाराला आपण भलीमोठी रक्कम फी म्हणून देतो, पण त्याबदल्यात चित्रपटाची कमाई तेवढी होत नाही”, असंही तो पुढे म्हणतो. मुळात चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याची मानसिकता आता कमी झाली आहे. केवळ 2 टक्के लोकसंख्याच तिकिटाचे पैसे भरून थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाते. हेच 2 टक्के जर 20 टक्क्यांमध्ये बदलले तर बॉलिवूड इंडस्ट्रीत भरभराट येऊ शकते, असे सैफचे म्हणणे आहे.
लवकरच सैफ ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारतोय. हा चित्रपटातील सीतेच्या तसेच रावणाच्या लूकवरून चांगलाच वाद रंगला आहे. मात्र व्हीएफएक्सद्वारे हा लूक बदलण्यात येत असल्याचं कळतंय. आदिपुरुषमध्ये सैफसोबत प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Actor Saif Ali Khan on Bollywood Film Performance