इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख खूप वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुख यांचा आगामी चित्रपट ‘मिस्टर मम्मी’ चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १० वर्षांनंतर रितेश आणि जेनिलिया ही जोडी पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशा सगळ्या चांगल्या वातावरणात आता चिंता वाढवणारी घटना घडली आहे. या चित्रपटाचे पोस्टर कॉपी केल्याचा आरोप केला आहे.
रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये रितेश देशमुख हा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला अनेकांनी पसंती दर्शवली होती. मात्र या पोस्टरवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खानने प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पोस्टर कॉपी केल्याचा आरोप केआरकेने केला आहे. कमाल आर खानने नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने एका हॉलिवूड आणि एका दाक्षिणात्य चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबर त्याने रितेशच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. त्यात तो म्हणाला, “या चित्रपट निर्मात्यांची कल्पकता तर पाहा, एका हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर दाक्षिणात्य चित्रपटाने कॉपी केले आणि आता दाक्षिणात्य चित्रपटाचे पोस्टर कॉपीवूडवाल्यांनी कॉपी केले. एवढे होऊनही ते स्वतःला चित्रपट निर्माते म्हणवून घेतात.”
रितेश देशमुखचा ‘मिस्टर मम्मी’ हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून जेनिलिया बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे ते दोघेही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करणार आहे. भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख, महेश मांजरेकर हे कलाकार दिसणार आहेत. काही जरी असले तरी ‘तेरे नाल लव्ह हो गया’, नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांची आवडती जोडी पडद्यावर धमाल करणार असल्याने प्रेक्षक मात्र या चित्रपटाबाबत उत्साही असल्याचे दिसत आहेत.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1585624747848585218?s=20&t=zrxCxlxnB1JjDDsQnlTn5w
Actor Riteish Deshmukh Movie Poster Copy
Entertainment Bollywood