इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा, रुबाबदार नट अशी ओळख असलेल्या रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. अत्यंत वाईट मरण त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्या निधनाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांची चर्चा सुरू झाली. मुलगा गश्मिर हा मनोरंजन क्षेत्रात असल्याने त्याच्याबाबत सगळ्यांनाच ठाऊक होते. पण, त्यांची पत्नी कोण, ती काय करते, याबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, महाजनींच्या मृत्यूनंतर याची चर्चा सुरू झाली.
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल गश्मीरने माहिती दिली. रवींद्र महाजनी यांच्या निधनाला नुकताच पंधरवडा उलटून गेला आहे. त्यानंतर गश्मीर सोशल मीडियावर ऑनलाईन आला. त्यावेळी त्याने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी चाहत्यांनी त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल तसेच कामाबद्दल प्रश्न विचारले. आपल्या आईची तब्यत आता जरा स्थिरस्थावर होत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. ‘तू शुटिंग पुन्हा सुरू केलंय का?’ असं विचारणाऱ्या चाहत्याला गश्मीर म्हणाला, “माझ्या आईची प्रकृती स्थिर झाल्यावर लवकरच मी शुटिंग सुरू करेन.” रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी तळेगाव येथील त्यांच्या राहत्या घरात आढळला. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यांचे निधन झाल्याचे समोर आले.
actor ravindra mahajani wife gashmeer post
Entertainment marathi film movie