इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सामान्यपणे वडील डॉक्टर असले की त्यांचा मुलगा किंवा मुलगी हे डॉक्टरच होणार, असा प्रघात असतो. तसेच अभिनेत्याची मुले ही मनोरंजन क्षेत्रातच जातात, अशीच उदाहरणे आहेत. पण एका प्रथितयश अभिनेत्याच्या मुलीने हे समज खोडून काढत थेट देशसेवेची वाट धरली आहे. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या मुलीने अभिमानास्पद निर्णय घेतला आहे. इशिता भारतीय सैन्यात भरती होणार आहे. इशिता दिल्ली संचालनालयाच्या ‘७ गर्ल बटालियन’ची कॅडेट आहे. सोशल मीडियावर या बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेते आणि भाजप नेते रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय संरक्षण दलात सामील होणार आहे. देशाचे सैन्य अधिक सक्षम आणि तरुण बनवण्याच्या उद्देशाने केंद्राने अग्निपथ भर्ती मॉडेल सुरू केले होते. हा कार्यक्रम लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी सैन्य भरती करण्यासाठी डिझाइन करण्यात आला असून याअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सशस्त्र दलात सेवा करण्याची परवानगी दिली जाते. रवी किशन यांनी त्यांच्या मुलीबाबतची ही बातमी अभिमानाने ट्विटरवर शेअर केली असून त्यांचे अभिनंदन करणारे विविध ट्वीट त्यांनी ट्विटरवर रीट्वीट केले आहेत. इशिता शुक्ला अवघी २१ वर्षांची आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
इशिताच्या या निर्णयामुळे नेटिझन्सनी इशिता आणि रवी या दोघांचेही खूप कौतुक केले आहे. खरा ‘देशभक्त’ कसा असावा हे लोकांनी रवी यांच्याकडून शिकावे, असेही अनेकांनी म्हटले आहे. एका युजरने म्हटले की, ‘देवाचे आभारी आहे की ती तिचे आयुष्य तिच्या इच्छेनुसार जगत आहे, ती प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे, किमान ती घराणेशाहीला खतपाणी घालत नाही. ‘आणखी एका युजरने इशिताबाबत अधिक माहिती आणि तिला आतापर्यंत मिळालेले यशही शेअर केले. या युजरने लिहिले की, ‘ती एनसीसीमध्ये आहे आणि कठोर प्रशिक्षण घेऊन तिने राजपथ दिल्ली शिबिर पूर्ण केले आणि या स्पर्धेत टिकणं सर्वांसाठी सोपं नाही. तिला सलाम’. एवढ्या लहान वयात असा अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल अभिनेत्याचे चाहते तिचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. ट्विटरवर इशिताचे अभिनंदन करणारे अनेक ट्वीट शेअर करण्यात आले आहेत, जे रवी यांनी रीट्वीट केले आहेत.
इशिताशिवाय रवी किशन यांना रिवा, तनिष्क आणि सक्षम अशी आणखी तीन मुलं आहेत. यापैकी रिवाला अभिनेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनेत्री बनायचे आहे. तिने आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले असून नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत एका नाटकातही ती काम करतेय.