इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे. यावरून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. रणवीरच्या या फोटोशूट विरोधात पुण्यात तसेच चेंबूर येथे गुन्हा दाखल झाला. आता त्याच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होताना दिसते आहे. कोलकाता येथील उच्च न्यायालयात त्याच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोलकाता येथील वकील नाझिया इलाही खान यांनी ही याचिका दाखल केली आहे.
नाझिया यांच्या मते, रणवीर सिंह यांनी केलेले हे फोटोशूट पूर्णपणे अश्लील आहे. या फोटोशूटचा कोलकात्यातील लोकांवर आणि अल्पवयीन मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. रणवीरचे हे फोटो मासिकातून काढून टाकण्यात यावेत तसेच रणवीरचे फोटोशूट करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या सर्व प्रती तात्काळ जप्त करण्यात याव्यात. यासह रणवीर सिंगचे हे फोटो कोलकात्याच्या सर्व वेबसाईटवरून ब्लॉक करावेत, असे नाझिया यांचे म्हणणे आहे.
रणवीरचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा प्रदर्शित होणार होता. त्यामुळे फोटोशूटचे हे फोटो उशीरा प्रसिद्ध करण्यात आले. रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी, पूजा भट्ट आदींनी न्यूड फोटोशूट केले होते.
Actor Ranveer Singh Nude Photo Shoot PIL