मुकुंब बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
अभिनेता रणधीर कपूरने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. रणधीर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमन राज कपूर यांचा मुलगा आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक कलाकार म्हणून चित्रपटातून केली होती. रणधीर कपूर यांचा जन्म दि. १५ फेब्रुवारी १९४७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर हे देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते होते. लहानपणापासूनच घरातल्या फिल्मी वातावरणामुळे त्यांची आवड अभिनयाकडेही होती. रणधीर कपूरने सर्वप्रथम वडील राज कपूर यांच्या ‘श्री 420’ आणि ‘दो उस्ताद’ या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. पडद्यावर प्रेक्षकांना ती भूमिका चांगलीच आवडली होती. रणधीर कपूर यांनी १९७१ साली कल आज कल या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
रणधीर कपूरने रामपूर का लक्ष्मण, जवानी दिवानी, हाथ की सफाई, धर्म कर्मा, चाचा भतीजा, कसमे वादे, आखरी दुख, पुकार, राज तेरी गंगा मैला, हाऊसफुल आणि हाऊसफुल 2 यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. तसेच अभिनयासोबतच रणधीर कपूरने हिना, प्रेम ग्रंथ आणि आ अब लौट चले या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्याकाळी रणधीर कपूर हे १९७१ ते १९७५ या काळात बॉलीवूडमधील तिसरे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. १९७२ मध्ये रणधीरने सलग तीन सुपरहिट चित्रपट दिले. पण १९८५ च्या दरम्यान त्यांची कारकीर्द जवळपास संपुष्टात येत होती आणि अशा परिस्थितीत रणधीरने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले.
चित्रपटांव्यतिरिक्त रणधीर कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहेत. त्याची पत्नी सुंदर अभिनेत्री बबिता आहे. अभिनेता पहिल्याच नजरेत बबिताच्या प्रेमात पडला होता. त्याला लवकरात लवकर बबितासोबत लग्न करायचं होतं पण त्यावेळी कपूर घराण्यातील एकाही अभिनेत्रीचं लग्न कपूर कुटुंबात झालं नव्हतं, त्यामुळे संपूर्ण कुटुंब रणधीरच्या निर्णयाच्या विरोधात होतं. रणधीरचे बबिता इतके प्रेम होते की, त्याने तिच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्यासही होकार दिला होता. बबिताच्या सांगण्यावरून त्यांनी वडील राज कपूर यांच्याशी त्यांच्या आणि बबिताच्या नात्याबद्दल बोलले, पण राज कपूर बबिताला त्यांच्या चित्रपटांची नायिका बनवायला तयार होते, पण घरची सून नाही.
रणधीर आणि बबिता अनेकदा पार्टीत आणि मित्रांसोबत दिसत होते, तर दुसरीकडे बबिताने रणधीरवर लग्नासाठी दबाव टाकला होता. अशा परिस्थितीत रणधीरने पुन्हा एकदा लग्नाला होकार दिला. लग्नाला मान्यता मिळाली होती पण त्यादरम्यान राज कपूरसोबत एक अट घातली होती की जर दोघांनी लग्न केले तर बबिताला तिचं फिल्मी करिअर सोडावे लागेल. बबिता आणि रणधीर कपूर यांचे १९७१ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर रणधीर आणि बबिता वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते, पण रणधीरचे दारूचे व्यसन व करिअरबाबतचा बेफिकीरपणा बबिताला सहन झाला नाही. अशा परिस्थितीत करिनाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने घर सोडले. बबिता आपल्या दोन मुली करिश्मा आणि करीनासोबत वेगळे राहू लागली आणि त्यांनी संगोपनही केले. त्या काळात रणधीर आपल्या मुलांना भेटायला यायचा, पण हे दोघे एकत्र राहत नव्हते. मात्र सध्या रणधीर कपूर आणि बबिता एकत्र राहतात.