इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच रणबीर दक्षिण भारतात दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या व्हिडिओची मोठी चर्चा सुरू आहे. रणबीरच्या शेजारी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजमौली आणि लोकप्रिय अभिनेता नागार्जुनही जेवताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत रणबीरचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर-आलिया पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची समाज माध्यमांमध्येही बरीच चर्चा आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार सुरू आहे. रणबीरही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे.
नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम चेन्नईमध्ये दाखल झाली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेण्डच्या पार्श्वभूमीवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “कितीही स्टंट केले तरी चित्रपट फ्लॉपच होणार आहे”, असं म्हटलं आहे. रणबीरसह एस.एस.राजामौली आणि नागार्जुनला पाहून एकाने “दाक्षिणात्य सुपरस्टारची ही ताकद आहे”, अशी कमेंट केली आहे. “रणबीर चित्रपट चालणार नाही हे पाहून दाक्षिणात्य सुपरस्टारकडे गेला का?”, असं कमेंट करत नेटकऱ्याने म्हटलं आहे.
Actor Ranbir Kapoor Troll Viral Video
South Indian Food Bollywood