इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांना तब्बल ११ वर्षांनंतर लेक झाली. त्यामुळेच या चिमुरडीचे आगमन त्यांच्यासाठी अगदी खास आहे. त्यामुळेच तिचे स्वागत जोरदार होणार यात काही संशयच नाही. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दहा दिवसांपूर्वी उपासनानं गोड मुलीला जन्म दिला. लेकीच्या येण्यानं घरात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या लेकीचं थाटामाटात बारसं करण्यात आलं.
काय आहे नाव?
पारंपरिक पद्धतीनं रामचरणच्या लेकीचं बारसं पार पडलं. सगळ्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते. तर पाढंऱ्या रंगाच्या कापडाच्या झोपाळ्यात रामचरणची लेक दिसते आहे. रामचरणच्या लेकीचं नाव ‘क्लिन कारा कोनिडेला’ असं ठेवण्यात आलं आहे. उपासनानं याचा अर्थ सांगितला आहे. तिनं म्हटलंय की, या नावाचा अर्थ आध्यात्मिक जागृती करणाऱ्या उर्जेचं प्रतीक असा होतो. हे नाव ललिता सहस्रनाम स्त्रोतातून घेतलं आहे. आध्यात्मिक जागृती करणारं हे नाव आहे, असं उपासना सांगते.
रामचरण आणि उपासना यांच्या लेकीच्या बारशाचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. रामचरणनं लेकीच्या बारशाचे काही फोटो शेअर करत तिचं नावही सांगितलंय. रामचरणनं शेअर केलेल्या फोटोत चिमुकलीचे आई-बाबा तर आहेत, तसंच आजी-आजोबाही आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. दरम्यान, रामचरणनं फोटो शेअर केले असले तरी, अद्यापही लेकीचा चेहरा दाखवला नाही. इतक्यात तरी ते लेकीचा फोटो शेअर करणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
लेकीचे आगमन थाटात
लग्नाच्या ११ वर्षानंतर रामचरण आणि उपासना आई-बाबा झाले आहेत. त्यामुळं आता त्यांच्या आयुष्यातलं एक वेगळं पर्व सुरू झालं आहे. लेकीच्या जन्मापूर्वीच तिच्या आगमनाची मोठ्या जल्लोषात तयारी सुरू झाली होती. इतकंच नव्हे तर रामचरण आणि त्याच्या पत्नीनं आपल्या बाळासाठी हातानं तयार केलेला पाळणा सर्वात आधी खरेदी केला होता. विशेष म्हणजे हा पाळणा मानवी तस्करीमधून सुटका झालेल्या लोकांनी तयार केला आहे. इतकंच नाही तर आरआरआर सिनेमाचा गायक काला भैरव यांनी राम चरणच्या लेकीसाठी खास धून तयार केली आहे.
आजोबांची खास पोस्ट
आपल्या नातीबद्दल बोलताना मेगास्टार चिरंजीवी यांनी देखील एक खास पोस्ट केली. ते म्हणतात “राम चरणची लेक सकारात्मकता घेऊन आली आहे. मंगळवार हा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे. या शुभदिनी बाळाचा जन्म झाला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत”.