मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या जोड्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यापैकीच एक प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे राज कपूर आणि नर्गिस दत्त होय. यांच्या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीत नेहमीच चर्चा होत असे. त्याच प्रमाणे त्यांच्या प्रेम कहाणीची देखील चर्चा होत असे.
विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये नायकाचे नाव अनेकदा अभिनेत्रीसोबत जोडले जाते. अनेकवेळा दोघेही हे आपले नाते स्वीकारून ते पार पाडतात, तर अनेक प्रेमकथा खऱ्या असूनही अपूर्ण राहतात. त्या कथांना स्थान मिळत नाही. अशीच एक अपूर्ण प्रेमकहाणी म्हणजे नर्गिस आणि राज कपूर यांची होय.
बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा अपूर्ण प्रेमकहाण्यांची चर्चा होते तेव्हा पहिले नाव राज कपूर आणि नर्गिसचे घेतले जाते. आजही लोक राज कपूर आणि नर्गिसवर चित्रित केलेले ‘प्यार हुआ इकरार हुआ’ गाणे गुणगुणतात. दि. ३ मे १९८१ या दिवशी नर्गिस यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. नर्गिसच्या निधनानंतर राज कपूर खूप दु:खी झाले होते.
या दोघांच्या जोडीने रील लाईफमध्ये खूप हिट चित्रपट दिले. खऱ्या आयुष्यातही अनाठायी प्रेमानंतर दोघेही एकमेकांसोबत राहू शकले नाहीत. दोघांमधील प्रेम त्यांच्या चित्रपटांमध्येही स्पष्टपणे पाहायला मिळत होते. जेव्हा राज कपूर पहिल्यांदा नर्गिसला भेटले तेव्हा ती एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली होती. संवादादरम्यान, एकदा राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूरने सांगितले होते की, दोघे १९४९ मध्ये अंदाज चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. नर्गिसला पाहताच राज कपूर तिच्या प्रेमात पडले आणि नर्गिसही तिच्यावर प्रेम करू लागली.
नर्गिस, राज कपूर या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘आग’ होता. यानंतर दोघांनी बरसात (1949), प्यार (1950), आवारा (1951), आशियाना (1952), पापी (1953), श्री 420 (1955), चोरी-चोरी (1956) असे हिट सिनेमे दिले. मात्र, 9 वर्षांच्या प्रदीर्घ रिलेशनशिपमध्ये राजने नर्गिसला अनेकदा आश्वासन दिले होते की, तो आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल, पण तसे झाले नाही.
कदाचित राज कपूर पत्नी कृष्णा कपूरला कधीही सोडणार नाहीत, याची जाणीव नर्गिसला झाली असावी. त्यानंतर नर्गिसने असे पाऊल उचलले ज्याची राज कपूर यांनी कल्पनाही केली नसेल. सन 1957 मध्ये नर्गिसने राज कपूर यांना न सांगता सुनील दत्तसोबत मदर इंडिया हा चित्रपट साइन केला. यादरम्यान चित्रपटाच्या सेटवर आग लागली आणि सुनील दत्त यांनी नर्गिसला वाचवले, मात्र त्या स्वत: भाजल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केले.
नर्गिसच्या लग्नाच्या बातमीने राज कपूर पूर्णपणे कोलमडले. कारण नर्गिसला विसरणे राज कपूरसाठी सोपे नव्हते. दरम्यान, राज कपूरची पत्नी कृष्णा कपूरने खुलासा केला होता की, ते रोज रात्री दारू पिऊन यायचे आणि बाथटबमध्ये पडल्यावर रडायचे. आपण स्वप्न पाहत नाही आहोत हे समजावे म्हणून ते सतत सिगारेट ओढत असे. 1981 मध्ये कॅन्सरमुळे नर्गिसचा मृत्यू झाला. राज कपूर यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते आधी हसायला लागले आणि नंतर हसून रडायला लागले.