इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो असला तरी तो तेवढाच वादग्रस्त देखील असतो. अनेक दिग्गज कलाकार यात स्पर्धक म्हणून सहभागी होतात. यातीलच एक स्पर्धक म्हणजे अभिनेता राहुल देव. हातात कोणतही काम नसल्याने ‘बिग बॉस’ केल्याचं नुकत्याच एका खासगी मुलाखतीत त्याने सांगितलं.
राहुलची पत्नी रीना देव हिचे २००९ मध्ये निधन झाले. त्यानंतर राहुलला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. खरं तर बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये राहुलचा समावेश होतो. याच अभिनयसंपन्नतेच्या जोरावर त्याने हिंदीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. पत्नीच्या निधनानंतर मात्र त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या. राहुल सिंगल पॅरेन्ट आहे, हे अनेकांना माहीत नसेल. आपल्या पत्नीच्या माघारी तो आपल्या मुलाला एकटाच वाढवतो आहे.
राहुल सांगतो, सिंगल पॅरेंटिंग अजिबात सोपे नाही. मुले वाढवताना आवश्यक असणारा पेशन्स बायकांकडे मोठ्या प्रमाणात असतो. तो पुरुषांकडे नसतो. त्यामुळे माझ्या मुलाला वाढवताना मला अनेकदा समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेकदा माझा स्वतःवरचा ताबा सुटला. एकट्यानेच आई आणि वडिलांची भूमिका निभावणे कठीण असते, हे तेव्हा माझ्या लक्षात आले.
माझा मुलगा उच्चशिक्षणासाठी लंडनला गेल्यावर राहुलने पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक करण्याचे ठरवले. पण मध्ये जवळपास साडे चार – पाच वर्षांचा गॅप झाल्याने त्याला काम मिळणे कठीण गेले. यामुळे तो ‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वात सहभागी झाला. याबाबत तो सांगतो की, मला कोणाला दोष द्यायचा नाही. हे क्षेत्र खूप वेगवान आणि अनिश्चित आहे. आणि त्यात मी तर अनेक वर्ष या क्षेत्रापासून दूर राहिलो होतो. त्यामुळे मला काम मिळत नव्हते. म्हणूनच मी नाइलाजास्तव ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालो. मात्र यासाठी मी कोणालाही कारणीभूत समजत नाही.
Actor Rahul Dev Big Boss Acting Life Story