मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकप्रिय मराठी जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक त्यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. प्रसाद आणि मंजिरी यांनी आज लग्नाची 25 वर्षे पूर्ण केली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या जोडप्याने सोशल मीडियावर एकमेकांसाठी रोमँटिक पोस्ट शेअर केल्या आहेत.
अभिनेता प्रसाद ओक याने पत्नी मंजिरीसोबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, “आज आमचं लग्न 25 व्या वर्षात पदार्पण करतंय. एवढ्या मोठ्ठ्या काळात आयुष्याचे अनेक चढउतार पाहिले. अनेक सुख दुःखाचे क्षण अनुभवले. अनेक माणसं, अनेक नाती जोडली… तुटली सुद्धा… या सगळ्यात अविरत राहिली ती फक्त तुझी सोबत…तुझी साथ… आणि तुझं प्रेम…!!!
प्रसाद आणि मंजिरी यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर, हे दोघे 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघे एका वर्कशॉपमध्ये एकमेकांना भेटले. एकमेकांच्या जवळ आले. नंतर या जोडप्याला समजले की, ते त्यांचे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवू शकतात. आणि त्यांनी 7 जानेवारी 1998 रोजी लग्न केले.
आपण आजवर प्री वेडिंगचे व्हिडिओ किंवा फोटो पाहिले आहेत. परंतु प्रसाद ओकने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनोखे गिफ्ट दिले आहे. हे गिफ्ट म्हणजेच पोस्ट वेडिंगचा व्हिडिओ. प्रसादने शेअर केलेला हा व्हिडिओ अवघ्या मिनिटातच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. म्हणूनच त्याला शेकडो लाईक्स मिळत आहेत.